कोरोना संकटात बंद पडलेली रत्नागिरी-सैतवडे एसटी बस पुन्हा सुरू
गावात बस पोहोचताच ग्रामस्थांनी केले स्वागत!
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी आगाराकडून कोरोना काळापासून बंद असलेली दुपारी तीन वाजता सुटणारी रत्नागिरी-सैतवडे एस टी सेवा दि.२० मार्चपासून सुरु करण्यात आली आहे. या सेवेचा सर्व प्रवासी, विद्यार्थी, वर्गानी लाभ घ्यावा, असे आवाहन सैतवडे ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
ही गाडी रत्नागिरी आगारातून ३ वाजता तर सैतवडे येथून ५ वाजता सुटेल. सोमवारी संध्याकाळी पेठ मोहल्ला येथे पुन्हा सुरू झालेल्या एसटी गाडीचे सैतावडे ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते शुकुर चिलवान यांच्या हस्ते नारळ फोडून या गाडीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी रत्नागिरीहून या गाडीबरोबर माजी पोलीस पाटील इब्राहिम मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते अजिज मुकादम, पत्रकार जमीर खलिफे यांनी प्रवास केला. पेठ मोहल्ला स्टॉप जवळ गाडीचे स्वागत करण्याकरिता अजित मुल्ला, अकबर पागरकर,शफी चिकटे, फैयाज कापडे, सिराज कापडे , सैतवडे माजी सरपंच सदाशिव पवार आदी उपस्थित होते.
यानिमित्त एसटीचे वाहक व चालक यांना श्रीफळ देऊन एसटी बसचे स्वागत करण्यात आले.