गोमातेच्या संरक्षण संदर्भात मागण्यांसाठीचे भगवानबुवा कोकरे यांचे उपोषण मागे

खेड : गोमाता संरक्षण संदर्भातील मागण्यांसाठी तालुक्यातील लोटे येथे भगवान बुवा लोकरे यांनी सुरू केलेले उपोषण जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या यशस्वी चर्चेनंतर मागे घेतले आहे.
ह. भ. प. श्री. भगवान कोकरे महाराज हे गोमातेच्या विविध मागण्यांसाठी मागील ६ दिवसांपासून लोटे येथे उपोषण करत होते. रत्नागिरी दौऱ्यावर असताना, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी लोटे, खेड येथे त्यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
गोमातेच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या मागण्यांसाठी भगवानबुवा कोकरे यांनी सुरू केलेल्या उपोषणाबाबत पालकमंत्र्यांनी संवेदनशीलतेने चर्चा केली. त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले आणि अखेरीस त्यांचे उपोषण सोडवण्यात यश मिळाले.
गोमातेच्या संरक्षणासाठी महाराजांनी घेतलेल्या या पुढाकाराचा सन्मान करत, संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी योग्य पावले उचलण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. गोमातेचे रक्षण ही आपल्या समाजाची सामूहिक जबाबदारी असून, यासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.