जिल्हा प्राथमिक शिक्षक संघातर्फे २ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
- प्रलंबित मागण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील हजारोंनी शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार : संतोष कदम
लांजा : सरकारी शाळांचे होणारे खाजगीकरण थांबवून शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक कामे बंद करावीत या प्रमुख मागणीसह अन्य महत्वाच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने दि. २ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयांवर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष कदम यांनी दिली.
उठ शिक्षका जागा हो संघर्षाचा धागा हो हे सूत्र घेऊन हा आक्रोश महामोर्चा २ ऑक्टोबरला दु. २ वाजता माळनाका येथील शासकीय विश्रामगृह ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संतोष कदम यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, अनेक वेळा संघटना काय करतात म्हणून प्रश्न उपस्थित केला जातो. म्हणूनच संघटनेने शिक्षकांच्या अस्तित्वासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी संघर्षाची हाक दिलेली आहे. संपूर्ण राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर हा मोर्चा शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे.
या आक्रोश मोर्चामध्ये शाळा समायोजनाचा निर्णय रद्द करा, आम्हाला शिकवू द्या विद्यार्थ्यांना शिकू द्या, जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करा, दत्तक शाळा योजना रद्द करा, कंत्राटीकरण योजना रद्द करा, सर्व अशैक्षणिक कामे बंद करा कारण प्राथमिक शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामे लावून त्यांना अध्यापनाच्या कामापासून दूर ठेवले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अध्यापनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. या सर्व अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करावे व पूर्णवेळ अध्यापन करू द्यावे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आंदोलनासाठी उतरला आहे. तरी शिक्षकांच्या अस्तित्वासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी या आक्रोश महामोर्चात सामील व्हावे असे आवाहन यानिमित्ताने संतोष कदम यांनी केले आहे.
या आक्रोश मोर्चाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा व सर्व तालुका शाखा मेहनत घेत आहेत. यामुळे जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने प्राथमिक शिक्षक या मोर्चात सहभागी होणार असल्याचे संतोष कदम आणि शेवटी सांगितले.