झेप महोत्सवात घडले सर्वधर्मसमभावाचे दर्शन!
रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप-२०२३’ या सांस्कृतिक महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन
रत्नागिरी : ढोल – ताशांच्या गजरात निघालेली दिंडी, श्रीनटराजाची पालखी, भारतीय पारंपारिक वेशभूषा परिधान करून भारतातील विविधता, एकता, सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षतेचे दर्शन घडविणारे विद्यार्थी आणि महिला सबलीकरणाचे संदेश देणारे फलक, तरुणाईचा सळसळता उत्साह अशा जल्लोषपूर्ण वातावरणात काढलेल्या शोभायात्रेने गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप – २०२३’ या सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला.
महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक कलांचा उगम म्हणून शोभायात्रेकडे पाहिले जाते. कोकणातील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलाविश्वात महाविद्यालयाचे एक आगळेवेगळे स्थान आहे. सळसळत्या तरुणाईच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी महाविद्यालय कायमच प्रयत्नशील असते. विद्यार्थांना त्यांचे कलागुण सादर करण्याचे हक्काचे व्यासपीठ मिळते ते महाविद्यालयाच्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून अर्थात ‘झेप’ मधून. महाविद्यालयाच्या लौकिकाला साजेशा अशा झेप सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते.
जीजीपीएस शाळेच्या प्रांगणातून निघालेल्या शोभायात्रेने या महोत्सवाचा प्रारंभ झाला. विशेष म्हणजे यातून खास कोकणी संस्कृतीचे दर्शन घडले. श्रीनटराजाची पालखी, १९९५ च्या माजी विद्यार्थी पुरस्कृत मानाचा महाराजा करंडक, बुलेट रॅली हे या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. शोभायात्रा महाविद्यालयात आल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. खातू नाट्यमंदिरात शोभायात्रेची सांगता झाली.
खातू नाट्यमंदिरात पार पडलेल्या उद्घाटन समारंभाचा प्रारंभ श्री नटराजाच्या मूर्तीचे पूजन आणि पुष्प अर्पण करून आणि श्रीफळ वाढवून झाला. याप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. सतीश शेवडे, सहसचिव प्रा. श्रीकांत दुद्गीकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य प्रा. डॉ. मकरंद साखळकर, तिन्ही शाखांच्या उपप्राचार्या, झेप समन्वयक प्रा. आनंद आंबेकर, विद्यार्थी प्रतिनिधी यश सुर्वे आदि मान्यवर उपस्थित होते.
श्री. सतीश शेवडे म्हणाले की, झेप सांस्कृतिक महोत्सव विद्यार्थांच्या कलागुणांना वाव देणारा असून, महाविद्यालयीन जीवनातील हे आनंदाचे क्षण सोनेरी क्षणांनी लिहून ठेवण्यासारखे आहेत. त्याचा आनंद विद्यार्थांनी घ्यावा, असे ते पुढे म्हणाले. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणाऱ्या आणि नेतृत्व गुणांचा विकास करणाऱ्या झेपच्या नेटक्या संयोजनासाठी त्यांनी प्रा. डॉ. आनंद आंबेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना झेप सांस्कृतिक महोत्सव विद्यार्थांसाठी असून, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आणि महाविद्यालयाने घालून दिलेले मूल्ये, शिस्त इ. शी अधिष्ठित राहून रसिक विद्यार्थांनी या महोत्सवाचा आस्वाद घेऊन आपला आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे संयोजन वाणिज्य शाखेने केले होते. यानंतर वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनीने ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणरायाला वंदन करून गणेश वंदनेच्या माध्यमातून आपला नृत्याविष्कार सादर केला.
महाविद्यालयाचा ‘झेप’ सांस्कृतिक महोत्सव हा रत्नागिरीच्या सांस्कृतिक विश्वातील एक मैलाचा दगड मानला जातो. या महोत्सवात सांस्कृतिक कलागुणांबरोबरच महाविद्यालयातील शैक्षणिक – सहशैक्षणिक विभागांच्या वतीने वेगवेगळे विषय आणि पैलूंना स्पर्श करणाऱ्या, त्या विषयातील गमतीजमती, ज्ञान उलगडून दाखविणाऱ्या प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते. यंदा भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, गणित, संगणकशास्त्र, रसायनशास्त्र, मराठी विज्ञान परिषद, सह्याद्री माउंटेनियरिंग क्लब, खगोल मंडळ या विभागांनी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात विद्यार्थांनी अत्यंत कल्पकतेने विविध प्रयोग, उकरणे, गेम्स, पोस्टर्स, फिल्म अनेक मॉडेलमार्फत अभ्यासल्या जाणाऱ्या संकल्पनाची माहिती प्रदर्शित केली होती.
या महोत्सवातील विशेष कार्यक्रम म्हणजे ‘गुरु शिष्य संवाद’. रंगभूमीच्या अनेक आठवणींसह ‘गुरु शिष्य संवाद’ हा कार्यक्रम रंगला. यामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर सहभागी झाले.
महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थांनी थाटलेल्या फूड स्टॉलवरही लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांनी गर्दी केली. तसेच विद्यार्थिनीनी बनवलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तूंनी उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. या प्रदर्शनांना संस्थेचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी यांनी भेटी दिल्या.
संध्याकाळी नाट्य मंदिरात विविध लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या लोकनृत्यांचे विद्यार्थांनी सादरीकरण केले. असा हा तरुणाईचा उत्सव तीन दिवस रंगणार असून, विविध कार्यक्रमांची रेलचेल त्यात असणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवादरम्यान विविध प्रदर्शने, स्टॉल, फनी गेम्स याबरोबरच विविध प्रकारचे ९५ कलाप्रकार सादर होणार आहेत.