देवरुख भर बाजारपेठेत लागलेल्या आगीत तीन दुकाने भस्मसात
आगीत अडकलेल्या दोघांना वाचविण्यात यश
देवरूख (सुरेश सप्रे) : देवरूख शहरात एसटी स्टँडनजीक कच रविवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत तीन दुकाने भस्मसात झाली. ही आग शॉटशर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहीती आहे यात तीन दुकाने खाक झाली यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नगरपंचायत व नागरीकांना लगेचच धाव घेत आग नियंत्रणात आणल्याने सन २००२ सारखी दुर्घटना टळली.
ही आग बेकरीतील फ्रीजरमधील बिघाडामुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नागरिकांनी धाडस दाखवत बेकरीमधील दोन जणांना सुखरुप बाहेर काढले. भाजीपाला दुकान, किराणा माल, बेकरी अशा तीन दुकानांचे नुकसान झाले आहे. रविवारी रात्री १२.३० च्या सुमारास ही घटना घडली.
दरम्यान आग लागल्याचे समजताच आग विझवण्यासाठी न. प. कर्मचारीवर्ग व नागरिकांनी गर्दी केली. बेकरीतील पदार्थ, भाजी दुकानातील क्रेट यांनीही पेट घेतला. यातून आगीच्या ज्वाळा प्रवीण पागार यांच्या किराणा दुकानाला पोहोचल्या. दुकानातील तेल कॅन व किराणा मालही पेटला. अबीर मेडिकलमध्ये ही आग जाऊ नये, यासाठी नागरिकांनी किराणा दुकानाचे व मेडिकलचे छप्पर उडवले आणि आग तीन दुकानापुरतीच राहिली. बेकरीचे मालक अंबरीश चौधरी व त्यांचा कामगार आगीवेळी बेकरीतच होते. ही बाब नागरिकांना समजताच बेकरीमागील खिडकी तोडून या दोघांना बाहेर काढले.
भाजी दुकान हे दीपक येडगे यांचे होते. यादुकानातील कॅश सुमारे २२ हजार व महत्वाचे मूळ कागदपत्रे जळून खाक झाले. प्रवीण पागार यांच्या किराणा दुकानाचे नुकसान झाले.
महसूल विभागाने तातडीने पंचनामे केले.
देवरुखमध्ये अग्निशमन बंब नसल्याने तीन दुकानाला याचा फटका बसला आहे. यापूर्वी २००२ला बाजारपेठेत भीषण आगीत मोठे नुकसान झाले होते. गेल्या पाच वर्षात अशा आगीच्या चार ते पाच घटना घडल्या आहेत. त्यामुळे नगर पंचायतीला मंजूर असलेला अग्निशमन बंब शासनाकडून त्वरित मिळावा, अशी मागणी होत आहे.