पनवेलनजीक मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम
मुंबई : पनवेल ते कळंबोली सेक्शन दरम्यान मालगाडी रुळावरून घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. या अपघातामुळे मुंबईतून शनिवारी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी सुटणारी कोकणकन्या एक्सप्रेस सुमारे ५ तास उशिराने म्हणजे १ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पहाटे ४ वाजता मडगावसाठी सुटणार आहे. यामुळे या गाडीने येणाऱ्या कोकणवासियांचा मोठा खोळंबा होणार आहे.
पनवेल येथून वसईकडे जाणारी मालगाडी शनिवारी सायंकाळी ३ वाजून ५ मिनिटांनी घसरली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेच्या अखत्यारितील या अपघातामुळे या मार्गावरून कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी धावणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे.
या संदर्भात रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार मालगाडी घसरल्याने विस्कळीत झालेल्या वेळापत्रकामुळे शनिवार दि. 30 सप्टेंबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मडगाव ला येण्यासाठी रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी निघणारी कोकणकन्या एक्सप्रेस (२०१११) दिनांक १ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता सोडण्यात येणार आहे.
- हेही वाचा : Konkan Railway | दिवा-रत्नागिरी मेमू ट्रेन २ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार!
- Konkan Railway | चिपळूण-दिवा मेमू स्पेशलच्या फेऱ्यात ३ ऑक्टोबरपर्यंत
याचबरोबर ११०९९ एलटीटी – मडगाव ही गाडी देखील पहाटे चार वाजता मडगाव ला येण्यासाठी निघणार आहे. मालगाडीला पनवेल जवळ झालेल्या अपघातामुळे मडगाव ते पनवेल दरम्यान चालवण्यात येणारी 07104 मेमू स्पेशल गाडी रत्नागिरी ते पनवेल दरम्यान रद्द करण्यात आली आहे. मडगाव येथून सुटलेली ही गाडी रत्नागिरी पर्यंत चालवण्यात येणार आहे. याचबरोबर 07105 या क्रमांकाची पनवेल खेड हे अनारक्षित मेमू गाडी मालगाडीला झालेल्या अपघातामुळे रद्द करण्यात आली आहे.
अपघातामुळे ०११७१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी ही गणपती स्पेशल गाडी जे दिनांक १ ऑक्टोबर रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी सुटणार होती ती आता दहा तासापेक्षा उशिराने मुंडे सकाळी दहा वाजून 50 मिनिटांनी सीएसएमटी येथून सावंतवाडीकरता सुटणार आहे