परीक्षेला सामोरे जाताना…

वारंवार विचारले जाणारे दहा निवडक प्रश्न व त्यांची उत्तरे
सध्या बोर्ड परीक्षांचा हंगाम सुरू आहे.इयत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षेबाबत पालक व परीक्षार्थी यांच्याकडून वारंवार प्रश्न शाळा, शिक्षण विभागातील अधिकारी व मंडळाकडे विचारले जातात. त्यातील अधिकाधिक विचारल्या जाणाऱ्या दहा प्रश्नांचे संकलन राज्य मंडळ व विभागीय मंडळातील कामकाजाचा अनुभव असलेले प्रभारी सहसचिव दीपक पोवार यांनी केले आहे, ते प्रश्न उत्तरासह प्रसिद्ध करत आहोत.
-राजेश क्षीरसागर,
विभागीय अध्यक्ष,
कोल्हापूर व कोकण मंडळ.
प्रश्न ०१ : विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्थेबाबत कोणती काळजी घ्यावी ?
उत्तर :-विद्यार्थ्यांनी आपल्या बैठक व्यवस्थेबाबत परीक्षेच्या दिवसापर्यंत गाफिल न राहता किमान ०२ दिवस अगोदर बैठक व्यवस्थेची खात्री करावी. केंद्रावर बैठक व्यवस्थेबाबत फलक दर्शनी भागावर लावले जातात. अवगत होत नसल्यास आपल्या केंद्र शाळेशी किंवा आपल्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून बैठक व्यवस्था निश्चित करावी.
प्रश्न ०२ : परीक्षा दालनात परीक्षेसाठी किती वेळ अगोदर उपस्थित रहावे. ?
उत्तर :-विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्रावर एक तास आणि परीक्षा दालनात किमान अर्धा तास म्हणजेच सकाळ सत्रासाठी स. १०:३० वाजता व दुपार सत्रासाठी दुपारी ०२:३० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत सकाळ सत्रसाठी स. ११:०० नंतर व दुपार सत्रासाठी दु. ०३:०० नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांस परीक्षेस प्रविष्ट होता येणार नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षा संचलन सुकर होणेसाठी घंटेचे वेळापत्रक पहावे. तसेच गजर व टोल चा क्रम लक्षात घ्यावा.
प्रश्न ०३ :परीक्षेसाठी कोणते साहित्य बरोबर घेऊन जाणे आवश्यक आहे. ?
उत्तर :प्रवेशपत्र, परीक्षेसाठी किमान ०२ पेन (निळी / काळी शाई) परीक्षा पॅड, ज्यावर काही लिहिलेले नसावे, पारदर्शक पाणी बॉटल, शुगरचा विद्यार्थी असल्यास आवश्यक औषधे, गणित विषयासाठी आवश्यक असणारी विहित सामग्री.
विद्यार्थ्यांनी मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅलक्युलेटर किंवा इतर तत्सम इलेट्रॉनिक साहित्य परीक्षा दालनात घेवून जाऊ नये.
कोणत्याही परिस्थितीत अनावधानाने अगर जाणिवपूर्वक कोणताही कागद खिशामध्ये, कंपास बॉक्समध्ये राहणार नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
प्रश्न ०४ : परीक्षा ब्लॉकमध्ये उत्तरपत्रिका वितरीत झाल्यानंतर काय करावे. ?
उत्तर :-सर्व प्रथम बेंच सुस्थितीत असल्याची खात्री करावी. ही समस्या असल्यास बेंच बदलून घ्यावा. उत्तरपत्रिका नीट तपासून घ्यावी. उत्तरपत्रिकावरील सुचना वाचून घ्याव्यात. सर्व पाने इ.१२ वी करिता २८ पाने, तर इ. १० वी करिता २० पाने सुस्थितीत असल्याची खात्री करावी. काही पाने खराब असल्यास, पान क्रमांक नसल्यास तातडीने पर्यवेक्षकांकडून सदरची उत्तरपत्रिका बदलून घ्यावी. जर पेपर लिहिताना काही वेळाने सदर बाब लक्षात आल्यास परीक्षार्थ्यांनी घाबरुन न जाता आपल्या पर्यवेक्षकास सदर बाब निदर्शनास आणावी.
प्रश्न ०५ :-एखाद्या पेपरला हॉल तिकिट विसरल्यास काय करावे
उत्तर :घाबरून न जाता पर्यवेक्षक / केंद्रसंचालक यांना सदर बाब निदर्शनास आणावी. केंद्रावर दुबार प्रवेशपत्र असल्याने पडताळणी करता येऊ शकते पण जाणीवपूर्वक विसरु नये. केंद्रसंचालकांकडे हमीपत्र लिहून द्यावे, दुसऱ्या दिवशीच्या पेपरवेळी प्रवेशपत्र (Hall Ticket) न चुकता आणावे, ते केंद्रसंचालकांना दाखवावे.
प्रश्न ०६:- उत्तरपत्रिकेमध्ये कच्चे काम केले तर चालू शकते का ?
उत्तर: कच्चा कामासाठी सोबत कागद न नेता उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर कच्चे काम अशी नोंद करावी, मात्र उत्तरपत्रिकेच्या कोणत्याही पानावर नाव, बैठक क्रमांक, देवाचे नाव, सांकेतिक खुण, पास करण्याची विनंती, नोटा चिकटवणे, विसंगत बाबी लिहिणे,इत्यादी प्रकार टाळणे आवश्यक आहे. कारण वरील कृती ही गैरमार्ग ठरुन चौकशी अंती सदर विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द केली जाते.(बैठक क्रमांक पहिल्या पानावर विहित ठिकाणी नमूद करायचा असतो.)
प्रश्न ०७ :- खाजगी प्रकाशकांकडून वेळापत्रके प्रसिध्द होतात ती प्रमाणभूत मानावी का ?
उत्तर :-मंडळाने अधिकृत जाहीर केलेले जे आपल्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रदर्शित केलेले आहे. तसेच मंडळाच्या मोबाईल अॅप मध्ये उपलब्ध आहेत. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावरील परीक्षेचे वेळापत्रक प्रमाणभूत मानावे.
प्रश्न ०८ :-विद्यार्थ्यांस नैसर्गिक आपत्ती, अपघात, संप बंद, या कारणामुळे नियोजित वेळेत परीक्षा केंद्रांवर पोहचू न शकल्यास काय करावे ?.
उत्तर :अपवादात्मक परिस्थितीत अशा प्रसंगी आपल्या नजिकच्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होता येते, पण संबंधित केंद्रसंचालकांना त्याची वस्तुस्थितीची खात्री पटवून देणे आवश्यक आहे.
प्रश्न ०९ :-विद्यार्थ्यांस माध्यम बदलून प्रश्नपत्रिका प्राप्त झाली किंवा अन्य विषयाची प्रश्नपत्रिका प्राप्त झाली तर काय करावे. ?
उत्तर :- सदर बाब तातडीने पर्यवेक्षक व केंद्रसंचालक यांच्या निदर्शनास आणून चुकीची प्रश्नपत्रिका जमा करुन योग्य प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत अशा प्रसंगी तातडीने सूचित करावे, वेळ वाया घालू नये.
प्रश्न १० :-एखादे उत्तर चुकल्यास किंवा उत्तर बदल करावयाचा असल्यास काय करावे. ?
उत्तर :-अशा वेळी त्या उत्तरावर काट मारावी, कोणत्याही परिस्थितीत उत्तर चुकले आहे म्हणून उत्तरपत्रिकेचे पान फाडू नये. घाबरुन ते सोबत घेऊन जाऊ नये. अशी कृती केल्यास व गैरमार्ग ठरवून शिक्षेस पात्र व्हाल, याची नोंद घ्यावी.
- दीपक पांडुरंग पोवार
वरिष्ठ अधीक्षक तथा सहसचिव.