मराठी भाषा गौरव दिनी शिर्के प्रशालेच्या नानल गुरुकुलची प्रभात फेरी
रत्नागिरी : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शिर्के प्रशालेच्या ऍड. बाबासाहेब नानल गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी लेझीम नृत्य सादर करीत प्रभात फेरी काढली.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शहरातील विविध शाळांकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील माळनाका येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशालेतील एडवोकेट बाबासाहेब नानल गुरुकुल विभागाच्या विद्यार्थ्यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त हातात फलक घेऊन लेझीम नृत्य सादर करीत रॅली काढली. प्रभात फेरीमध्ये लेझीम नृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांसह मराठी भाषिकांना अभिमान वाटेल, अशी वेषभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये बाल शिवाजी साकारलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता.
शिर्के प्रशाले पासून स्काय ब्रिज मारुती मंदिर मार्गे प्रभात फेरी काढण्यात आली. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक तसेच कर्मचारी देखील रॅलीत सहभागी झाले होते.