दुसरीतील मृत विद्यार्थीनीच्या पालकांना फी भरण्यासाठी शाळेने पाठवली नोटीस !
उरणमधील युईएस शाळा व्यवस्थानाचा अजब प्रताप ; पालक, नागरिकांमध्ये तीव्र संताप
उरण (विठ्ठल ममताबादे ) : २०२२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात उरण तालुक्यातील यु. ई. एस. शाळेत इयत्ता २ री तुकडी अ या वर्गात शिकत असलेली उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा येथील कु. हर्षी भक्तेश म्हात्रे हिचे नोव्हेंबर २०२२ मध्ये निधन झाले तरीही यु ई एस शाळा व्यवस्थापनाने तिच्या पालकांना फी भरण्यास सांगितले आहे. नोव्हेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यानची फी त्वरित भरा, अशी पावती (नोटीस )दिल्याने म्हात्रे कुटुंबियांना एकच धक्का बसला. या अशा शाळा व्यवस्थापनाच्या बेकायदेशीर व भ्रष्ट कारभारामुळे उरणमधील पालक वर्ग, जनते मध्ये तीव्र संतापाची भावना पसरली आहे.
सविस्तर वृत्त असे की उरण तालुक्यातील नामांकित उरण एज्युकेशन सोसायटीची युईएस इंग्रजी माध्यमाची १२ पर्यंत शाळा आहे.या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हनुमान कोळीवाडा येथील रहिवासी भक्तेश म्हात्रे यांच्या आठ वर्ष वयाच्या दोन जुळ्या मुली दुसरीत शिकत होत्या
या दोन जुळ्या मुलींपैकी हर्षी हिचे १ नोव्हेंबर २०२२ रोजी दुदैवाने अकस्मित निधन झाले आहे.मुलीच्या निधनानंतर पालकांनी वर्ग शिक्षक,शाळा व्यवस्थापनाची भेट घेऊन याबाबत माहिती दिली आहे.मृत्युपत्र सादर करुन हर्षीचे नावही शाळेच्या रजिस्टर मधुन नोव्हेंबर महिन्यातच कमी केले आहे. मात्र चिमुकल्या हर्षीच्या अकस्मित दुदैवी निधनाने पालक दुखातुन अद्यापही सावरलेले नसताही २४ फेब्रुवारी रोजी शाळा व्यवस्थापनाने मृत हर्षीची माहे नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत ६००० रुपये फी तत्काळ भरण्यासाठी नोटीस बजावली आहे. कु. हर्षी भक्तेश म्हात्रे हिचे नोव्हेंबर महिन्यात अकस्मित निधन झाल्यानंतर शाळेच्या रजिस्टरमधुन नाव कमी करण्यात आले आहे.मात्र त्यानंतरही येथील युईएस शाळेने पालकांना त्वरित फी भरण्यासाठी नोटीस बजावली आहे.युईएस शाळा व्यवस्थापनाच्या या संतापजनक प्रकारामुळे तसेच शाळा व्यवस्थापन अनेकदा पालकांना विश्वासात न घेता विविध निर्णय घेत असल्यामुळे येथील पालक, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शाळा व्यवस्थापनाची चुक झाली आहे.फी वसुलीसाठी नोटीस काढणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींच्या पालकांची भेट घेऊन माफीही मागितली आहे. – तनसुख जैन, युईएस संस्थेचे अध्यक्ष.
शाळा व्यवस्थापनाचा हा प्रकार मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा आणि संतापजनक आहे.कोरोना काळातही शाळेने शासनाच्या आदेशानंतरही शाळा बंद असतानाही पालकांकडून सक्तीने फी वसूल केली आहे.आता पुन्हा ३१ टक्के फी वाढीचा प्रस्ताव आणला आहे.विचारणा करणाऱ्यांना व्यवस्थापनाकडून फी परवडत नसेल तर पाल्यांना म्युनिसिपल शाळेत घाला अशी उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत.शिक्षण घेण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. मात्र फी वसुलीसंदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने शाळा व्यवस्थापन कडुन पालकांना त्रास देणे सुरूच आहे. – प्राजक्ता गांगण, युईएस शाळेच्या पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा