रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवघ्या ७५० ग्रॅमच्या बालकाला नवसंजीवनी

रत्नागिरी : तेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मार्चमध्ये दाखल करण्यात आलेल्या अत्यंत कमी वजनाच्या बालकाला नवसंजीवनी देण्यात रुग्णालयाला यश आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथील विशेष नवजात शिशु काळजी कक्ष ( SNCU ) येथे दि. १५ मार्च /२०२५ रोजी सकाळी ५.५० वाजता श्रीम. लीना सुतार. वय – ३३ वर्ष.
राहणार – मु. पो. पाली, ता.जि. रत्नागिरी यांच्या पुरुष जातीच्या अर्भकाला दाखल करण्यात आले. सदर बालकाचा जन्म हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथेच दिनांक १५/०३/२०२५ रोजी सकाळी ०५.३० वाजता झालेला असून बालक जन्मतः खूपच कमी वजनाचे (७५० ग्रॅम) व कमी दिवसाचे (२७ आठवडे) होते.
बाळाची परिस्थिती अत्यंत नाजूक होती परंतु शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली SNCU विभागामध्ये कार्यरत बालरोग तज्ञ डॉ.शायान पावसकर ( सहाय्यक प्राध्यापक – शा.वै.महाविद्यालय व रुग्णालय,रत्नागिरी ) व डॉ. आदित्य वडगावकर ( वरिष्ठ निवासी डॉक्टर – शा.वै.महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी ) तसेच अधिसेविका श्रीम.जयश्री शिरधनकर, बालरोग तज्ज्ञ परिचारिका श्रीम.श्रुती जाधव व कक्ष पर्यवेक्षिका श्रीम.सुवर्णा कदम तसेच कार्यरत अधिपरिचारिका यांच्या अथक परिश्रमाने बालकामध्ये सुधारणा होत गेली.
बालकाला श्वसनाचा त्रास असल्याने व्हेंटिलेटरद्वारे कृत्रिमरित्या श्वास देण्यात आला. तसेच बालकाला RDS ( Respiratory Distress Syndrome ) वर उपचारासाठी श्वसन नलिकेद्वारे सारफॅक्टटेन्ट देण्यात आले. सदर बाळाच्या डोळ्याची ROP (Retinopathy of Prematurity) तपासणी आणि उपचार खासगी रुग्णालयामधून मोफत करून घेण्यात आले. सदर बालकाला Hydrocephalus असल्याचे निदान मेंदूची सोनोग्राफी करून करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी मध्ये प्रथमच सिरियल Lumber Tapping करून त्यावर उपचार करण्यात आला. आज ६० दिवसानंतर दिनांक १४/०५/२०२५ रोजी डॉक्टरांच्या सल्ल्याने अर्भकाला (डिस्चार्ज) घरी सोडण्यात आलेले आहे. डिस्चार्ज वेळी बालकाचे वजन १६९० ग्रॅम होते. सदरील बालकाच्या नातेवाईकांना नियोजित तारखाना तपासणी साठी पुन्हा येणे बाबत सूचना देण्यात आलेले आहेत. त्यासाठी संबंधित बालकाच्या नातेवाईकांना तपासणीच्या तारखांची फाईल तसेच आशा स्वयंसेवीकांच्या घरभेटी दरम्यान आशा कार्यकर्तीसाठी पाठपुरावा कार्ड देण्यात आलेले आहे.
सदर बालकाच्या नातेवाईकांनी सर्व डॉक्टर व कर्मचारी यांचे आभार मानले.