कोकण रेल्वे मार्गावर १५ जूनपासून पावसाळी वेळापत्रक

Team RatnagiriLive
2 Min Read
कोकण रेल्वे
  • पावसाळ्यात गाड्यांच्या वेगावर येणार मर्यादा

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी १० जूनपासून पावसाळी वेळापत्रक लागू होते. यावर्षी  ते पाच दिवस उशिराने लागू होणार आहे. या कालावधीत कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या गाड्यांची वेगमर्यादा कमी करण्यात येणार आहे. याचबरोबर  सहा एक्स्प्रेस गाड्यांच्या फेऱ्यामध्ये कपातही करण्यात आली आहे.

कोकणात पावसाळ्यात होणाऱ्या मुसळधार पावसात डोंगराळ भागामुळे कोकणातून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर काळजी घ्यावी लागते. गेल्या अनेक वर्षापासून रेल्वे प्रशासनाने कोकण मार्गावर घडणाऱ्या आपत्कालीन घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांचा अवलंब केला आहे. नवनव्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रवाशांचा प्रवास विनाअडथळा सुरळीत सुरू आहे. मुसळधार पाऊस झाल्यास रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकांवर विपरित परिणाम होवून रेल्वेगाड्या विलंबाने धावतात. कोकण मार्गावर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आतापासूनच नियोजनाची आखणी सुरु केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने पावसाळ्यात कोकण मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेगांवर मर्यादा घालण्याची निश्चितीही केली आहे.

दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यत कोकण मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेगावर मर्यादा घातल्या जातात. रोहा ते ठोकूर दरम्यान रेल्वे गाडया ताशी १२० ऐवजी ७५ किमीच्या वेगाने धावतात. मुसळधार पावसानंतर गाड्यांचा ताशी वेग ४० किमी होतो. यंदा १५ जूनपासून पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

‘पावसाळ्यातही नियमित वेळापत्रकानुसार गाड्या चालवाव्यात’

मागील अनेक वर्षांमध्ये कोकण रेल्वेने मार्गावर घडणाऱ्या पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. याचाच परिणाम म्हणून दुर्घटनांचे प्रमाणही घटले आहे. याचा विचार करता कोकण रेल्वेने इतर झोनप्रमाणे पावसाळ्यात देखील नेहमीच वेळापत्रकाप्रमाणे गाड्या चालवाव्यात, अशी मागणी काही प्रवासी संघटनांनी केली आहे. यामुळे पावसाळ्यात गाड्यांच्या वेगावर येणारी मर्यादा व त्यामुळे काही गाड्यांच्या फेऱ्या घटवून गाड्यांची जी कृत्रिम टंचाई निर्माण होते ती टाळता येऊ शकणार आहे. मात्र अशी परिस्थिती असतानाही कोकण रेल्वे दरवर्षी ‘मागील पानावरून पुढे’ असा कित्ता गिरवत असल्याने रेल्वे अभ्यासकांनी खंत व्यक्त केली आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment