राजापूर सिंधुदुर्ग दरम्यान १७ नोव्हेंबरला रेल्वेचा अडीच तासांचा मेगाब्लॉक
कोकण रेल्वे मार्गावरील सहा गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर राजापूर ते सिंधुदुर्ग स्थानकादरम्यान दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या सहा गाड्यांच्या वेळापत्रकावर या मेगाब्लॉक चा परिणाम होणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 12 या वेळेत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे कडून देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
मेगाब्लॉकमुळे मडगाव ते सावंतवाडी दरम्यान धावणारी पॅसेंजर गाडी (50108) दिनांक 17 नोव्हेंबर रोजी एक तास 20 मिनिटे उशिराने सुटणार आहे. सावंतवाडी ते दिवा दरम्यान धावणारी एक्सप्रेस गाडी (10106) सावंतवाडी रोड येथून 2 तास पाच मिनिटे उशिराने सुटणार आहे.
याचबरोबर दिनांक 17 रोजी ची मडगाव ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावणारी मांडवी एक्सप्रेस (10104) करमाळी ते सावंतवाडी दरम्यान वीस मिनिटे रोखून ठेवली जाईल. तर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस (12051) रत्नागिरी ते राजापूर दरम्यान वीस मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे. मेगा ब्लॉकचा परिणाम होणारी सहावी गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस (22119) ही आहे. दिनांक 17 नोव्हेंबर ची ही गाडी रत्नागिरी ते राजापूर दरम्यान वीस मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.