महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयशिक्षण

वंचितांच्या साक्षरतेसाठी गणेशोत्सव मंडळांनी घ्यावा पुढाकार!

“विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली…” – महात्मा जोतिबा फुले यांचे हे वचन महाराष्ट्राच्या वास्तवाला आरसा दाखवते. शिक्षण म्हणजे जीवनाचा श्वास, आत्मसन्मानाचा दीप व प्रगतीची किल्ली. तरीही आज राज्यात २०११ च्या जनगणनेनुसार तब्बल १ कोटी ६३ लाख असाक्षर नागरिक आहेत.

असाक्षरता ही केवळ वैयक्तिक मर्यादा नसून ती संपूर्ण समाजाची साखळी अडवणारी बेडी आहे. यामुळे लोकांची रोजगाराची दारे बंद होतात,ते आरोग्यविषयक माहितीपासून वंचित राहतात, आर्थिक व्यवहारांमध्ये अडखळतात,लोकशाहीत सक्रीय सहभाग कमी होतो.ही खरी सामाजिक शोकांतिका व वेदना आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेने जगातून 2030 पर्यंत असाक्षरता नष्ट करण्याचे शाश्वत विकासाचे ध्येय ठेवले आहे. केंद्र शासनाने सुरू केलेला “उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम” हा आशेचा किरण आहे.केंद्र शासनाने २०२२-२७ या कालावधीसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाने महाराष्ट्रात २०२३-२४ पासून वाटचाल सुरू केली. मागील दोन वर्षांत सुमारे १० लाख लोकांना साक्षर करण्यात आले. हा अंक महत्त्वाचा असला तरी राज्यातील १.६३ कोटींच्या तुलनेत तो अपुरा आहे. त्यामुळेच आता गती दहापट वाढवण्याची गरज आहे. वाचन, लेखन व संख्याज्ञान यापुढेही जाऊन जीवन कौशल्याचे शिक्षण अपेक्षित आहे.

१४ ऑक्टोबर २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाने या योजनेला मान्यता दिली, तर २५ जानेवारी २०२३ रोजी राज्य, जिल्हा, गट व शाळास्तरावर समित्या स्थापन करून अंमलबजावणीसाठी चौकट उभी केली. योजना तयार आहे; आता तिला जनचळवळीचा प्राणवायू मिळायला हवा.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा आरंभ करताना हेतू स्पष्ट केला होता – समाजाची एकजूट आणि जनजागृती. आज महाराष्ट्रात २ लाखांहून अधिक गणेशोत्सव मंडळे आहेत. प्रत्येक वस्ती, प्रत्येक गल्लीत ही सामाजिक ऊर्जा धडधडते आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळे ही समाज जागृतीचा मंच असली पाहिजेत. हा विचार कायम राहिला पाहिजे व टिकला पाहिजे.

गणेशोत्सव हा केवळ आरती-भजनाचा काळ नाही. तो आहे – “सामूहिक चेतनेचा उत्सव”. व्यसनमुक्ती, हुंडाबंदी, पर्यावरण या विषयांवर मंडळांनी चळवळी उभारल्या आहेत. आता हाच मंच साक्षरतेचा दीप प्रज्वलित करण्यासाठी वापरला पाहिजे.

“देवा हो देवा, गणपती देवा, तुझा मी पाई धरा…”
जशी भक्ती गणरायाच्या चरणी अर्पिली जाते, तशीच ज्ञानसाधना समाजाच्या सेवेत अर्पण केली पाहिजे.

“उजळून निघोनी गेला जीव हा ज्ञानदीपाने…”
या गाण्यातील ओळीप्रमाणे असंख्य निरक्षरांचे जीवन साक्षरतेच्या दीपाने उजळून निघाले, तर तोच खरा गणेशोत्सव ठरेल.

गणेशमंडळांना पुढील ठोस उपक्रम हाती घेता येतील.

  1. साक्षरता प्रबोधन शिबिरे
  2. साक्षरता कोपरा – मंडपात माहिती व पुस्तके
  3. भित्तिपत्रके व प्रदर्शन
  4. साक्षरतेवरील नाटिका, गीत, नृत्य
  5. डिजिटल साक्षरता शिबिरे
  6. साक्षरता संकल्प विधी
  7. साक्षरता दान पेटी
  8. “एक मंडळ – दहा साक्षर” अभियान

सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा मशाल हाती धरली, महात्मा फुल्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा उघडल्या, महर्षी कर्वे यांनी स्त्रीशिक्षणाचा मार्ग मोकळा केला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा संदेश दिला.
या महान वारशाला आजच्या गणेशोत्सवात नवजीवन द्यायची वेळ आली आहे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर सामाजिक प्रबोधनाची संधी आहे. जर प्रत्येक मंडळाने आपापल्या परिसरात किमान काही जणांना साक्षर केले, तर लाखो लोकांचे जीवन उजळेल.
या वर्षीचा जयघोष असा असावा :
“गणपती बाप्पा मोरया – असाक्षरतेचा नाश होवो, साक्षरतेचा प्रकाश होवो!”

कोल्हापूर विभागाअंतर्गत कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही ही चळवळ नेटाने चालवण्याची आवश्यकता आहे.
मागील वर्षीपासून राज्य योजना शिक्षण संचालनालयाने ‘ यंदाचा गणेशोत्सव साजरा करू उल्लासच्या संगे! या सुरू केलेल्या स्तुत्य उपक्रमात सार्वजनिक गणेश मंडळासह सर्व समाज घटक सहभागी होतील, ही अपेक्षा..!

राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष कोल्हापूर व कोकण मंडळ, तथा विभागीय समन्वयक ‘ उल्लास ‘

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button