विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या बाईंचा वाढदिवस साजरा केला हटके पद्धतीने!
लांजा: आयुष्याच्या जीवनप्रवासात दरवर्षी वाढदिवस येतो.. मित्रमंडळी, नातेवाईक हा दिन विविध प्रकारे साजरा करतात. सोशल मिडियावर हल्ली शुभेच्छा दिल्या जातात. शुभेच्छांचा जणू पाऊस पडतो. लहान विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षिकेची माया, प्रेम, आपुलकी मिळाली की निरागस विद्यार्थी आणि बाईंचं एक घट्ट नातं तयार होतं ..! असंच नातं आपल्या कोमल स्वभावाने तयार झालं की, मग आनंदोत्सवाला भरती येते. तसाच आपल्या आवडत्या बाईंचा हटके वाढदिवस विद्यार्थ्यांनी पालकांसह साजरा केला. आणि आगळवेगळी भेटवसतुही दिली.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नं.५ च्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका श्रीम. माधुरी अरुण साळवी यांचा वाढदिवस नुकताच वर्गातील मुलामुलींनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत जाऊन वाढदिवस साजरा करीत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. इयत्ता ४ थी च्या छोट्या मुलांनी बालबुद्धीला साजेसा दिमाखात आपल्या आवडत्या वर्गशिक्षिका श्रीम. साळवी बाईंचा वाढदिवस साजरा करत अभिष्टचिंतन केले. यावेळी मुलांनी स्वत: तयार केलेल्या भेटकार्डातून दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत आपल्या पालकांच्या उपस्थितीत वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. पालकांनीही आपल्या मुलांच्या बाईंना शुभेच्छा दिल्या. बाई देखील या वाढदिवसाने अक्षरशः भारावून गेल्या.