विभागीय शिक्षक भरती झालीच पाहिजे ; रत्नागिरीत आंदोलन
जिल्ह्यातील डीएड्, बीएड् धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरदणाणून सोडला.
रत्नागिरी : विभागीय शिक्षक भरती झालीच पाहिजे, विभागीय भरतीचा शासन निर्णय निर्गमित करा, स्थानिकांची टक्केवारी जाहीर करून त्यांना न्याय द्या, शिक्षणमंत्र्यांच्या विभागीय भरतीला आमचा पाठिंबा… विदर्भ, मराठवाड्यासाठी प्रत्येक वेळी कोकणचा बळी का?, शाळा आमची, पोरं आमची मग बाहेरच्या जिल्ह्यातील शिक्षक कशाला? अशा घोषणांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर जिल्ह्यातील डीएड्, बीएड् धारकांनी दणाणून सोडला.
विभागीय शिक्षक भरतीसाठी कोकण डीएड्, बीएड् धारक संघटनेच्या पदाधिकार्यांनी हे एक दिवसाचे धरणे आंदोलन करून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घोषणेला पाठिंबा दिला. शिक्षकांच्या जिल्हा बदलीच्या समस्येवर उपाययोजना करायची असेल, कोकणातील जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवायच्या असतील, तर विभागीय भरतीशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी मांडली.
या आंदोलनावेळी जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनाही हे निवेदन देण्यात आले. हे निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष संदीप गराटे, उपाध्यक्षा भाग्यश्री रेवडेकर-करंडे, सचिव संदेश रावणंग, प्रभाकर धोपट, कल्पेश घवाळी, राजेश इंगळे, तेजस्विनी सावन्त देसाई , योगेश मोरे , दीपाली किंजळे , प्रथमेश गोडबोले, प्रियंका नाखरेकर, श्रद्धा कदम आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भरती विभाग स्तरावर करण्याचे आश्वासन विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिले आहे. या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. या शिक्षक भरतीसाठी टीएआयटी परीक्षा झाली असून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. तत्पूर्वी विभागीय शिक्षक भरतीचा शासन निर्णय निर्गमित करून विभागीय आरक्षणाची टक्केवारी जाहीर करावी, अशी आमची मुख्य मागणी आहे. शिक्षणमंत्र्यांच्या विभागीय भरती प्रकियेच्या निर्णयामुळे कोकणातील शाळांना स्थानिक शिक्षक मिळतील. तसेच जिल्हा बदलीच्या समस्येवर तोडगा निघून येथील विद्यार्थ्यांचे नुकसान टळेल. शाळांमध्ये बोली भाषेतून शिकवायला शिक्षकही मिळतील. यासाठी विभागीय शिक्षक भरतीचा निर्णय योग्यच आहे.
विभागीय स्तरावर शिक्षक भरती करण्याचा शासन निर्णय निर्गमित करून कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा. विभागीय आरक्षणाबाबत टक्केवारी जाहीर करावी. त्यात विभागाला 70 टक्के व उर्वरित राज्याला 30 टक्के आरक्षण देण्यात यावे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केलेली 30 हजार रिक्त पदे एकाच टप्प्यात भरण्यात यावीत. कोकणातून होणार्या जिल्हा बदलीमुळे जि. प. शाळांतील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 1300 पदे रिक्त असून 700 शिक्षक जिल्हा बदलीच्या प्रक्रियेत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी पूर्ण करावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
टोप्या, फलक ठरले लक्षवेधी
या आंदोलनामध्ये ‘विभागीय शिक्षक भरती’ अशा आशयाच्या टोप्या आंदोलकांनी घातल्या होत्या. या टोप्यांसह आंदोलकांनी आणलेले घोषणा फलक लक्ष वेधून घेत होते. कोकणातील जिल्हा परिषद शाळा टिकवायच्या असतील, तर शिक्षकभरती करायला हवी, शिवाय विभागीय बदलीद्वारे परजिल्ह्यातील शिक्षकांच्या जिल्हा बदलीवर उपाय काढायला हवा, असा सूर या आंदोलनात उमटला.
वर्ष, दोन वर्षांच्या चिमुकल्यांचा सहभाग
सन 2010 नंतर 2017 ला झालेली शिक्षक भरती अजूनही अपूर्णच आहे. सीईटी, टीईटी, टीएआयटी परीक्षा अशा सातत्याने बदलणार्या निकषांचा फटका डीएड्, बीएड् धारकांना बसत आहे. शिक्षक पात्रता सिद्ध करून बहुतांश उमेदवारांची तर लग्न होऊन त्यांना मुलेही झाली आहेत. मात्र शिक्षक भरती सातत्याने लांबत आहे. या डीएड्, बीएड् धारकांची दीड, दोन वर्षांची चिमुकली मुलेही या आंदोलनात सहभागी झाली होती. तेरा ते पंधरा वर्षांच्या लढ्याला विभागीय भरतीच्या माध्यमातून यश येणार असल्याची प्रतिक्रिया या चिमुकल्यांच्या पालकांनी दिली.