सर्व शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा घ्यावी : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि. ४ : प्रत्येक शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सुकाणु समितीची बैठक आज घेण्यात आली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार उपस्थित होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य अनुपमा तावशीकर यांनी संगणकीय सादरीकरण करुन माहिती दिली. निपुण भारत अभियान अंतर्गत जिल्हा व तालुकास्तर स्त्रोत गट निर्मिती करुन ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. त्याचबरोबर निपुण मित्र कार्यशाळा ऑनलाईन घेण्यात आली. बाल सभा, पालक सभा आणि ग्राम सभाबाबतही आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, प्रत्येक शाळेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या माध्यमातून त्याबाबतचे प्रशिक्षण शाळांमधून द्यावे. त्याचबरोबर मॉक ड्रिलचे नियोजन करुन प्रात्याक्षिकही द्यावेत. आरोग्य तपासणीबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून आढावा घ्यावा. शिक्षकांचे प्राविण्य तपासून पहावे. उत्तम शाळा, उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांच्या कामाचे सार्वत्रिकरण केले जावे. अशा शाळांच्या भेटींचे नियोजन करावे. विस्तार अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांचे व एसएलएएस, एनएएसपीजीआय याबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक यांनी बैठकीतून उद्बोदन करावे. निपुण मित्र बैठक प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी लावावी.
या बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, मुख्याधिकारी तुषार बाबर, अधिव्याख्याता राजेंद्र लठ्ठे, दामले विद्यालयाचे शिक्षक रविंद्र शिंदे, प्रशासन अधिकारी सुनील पाटील आदी उपस्थित होते.