अमेरिकास्थित स्वरूप भागवत यांचे राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये व्याख्यान
देवरुख दि. २६ : आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटर क्षेत्राशी निगडीत आय टी तंत्रज्ञान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सॅन फ्रान्सिस्को, कॅलीफोर्निया, अमेरिका येथील उबर कंपनीचे सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर श्री. स्वरूप भागवत यांनी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागातील विद्यार्थ्यांना या विषयांवर मार्गदर्शन केले. ते मुळचे देवरुख येथील असून त्यांनी बिट्स पिलानीमधून बी. टेक. कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केले. स्टेट बँकेतील निवृत्त अधिकारी संजय भागवत व प्रा. सौ. मंजुश्री भागवत, आठल्ये सप्रे महाविद्यालय, देवरुख यांचे ते सुपुत्र आहेत.
महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागाने आयोजित या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला विभागप्रमुख प्रा. लक्ष्मण नाईक यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे प्रयोजन स्पष्ट केले. यानंतर प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी मान्यवरांचे स्वागत केले व त्यांची ओळख करून दिली.
यानंतर स्वरूप भागवत यांनी कॉम्पुटर क्षेत्राशी निगडीत आय टी तंत्रज्ञान व समकालीन घडामोडी यावर विस्तृत मार्गदर्शन केले. वेब डिझाईन, डाटा स्ट्रक्चर, डाटा टेक्नोलॉजी, आर्टिफ़िसिअल इंटेलिजन्स, प्रोग्रामिंग, टेस्टिंग, मायक्रोप्रोसेसर, मेमरी मॅनेजमेंट, ब्लॉक चेन तंत्रज्ञान विशद करून विद्यार्थ्यांना त्याचे महत्व स्पष्ट केले. तसेच या शाखांवर आधारित उद्योगांमध्ये उपलब्ध रोजगार संधीची त्यांनी माहिती दिली.
आय टी इंडस्ट्रीमधील सध्याची परिस्थिती सांगताना ते म्हणाले विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम बरोबरच औद्योगिक क्षेत्रातील सद्यस्थितीचे ज्ञान असणे महत्वाचे आहे. त्यानुसार त्यांनी स्वतःला विकसित करणेही तितकेच गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी प्रोग्रामिंग किंवा कोडींग स्कीलच्या पलीकडे झेप घेण्याची क्षमता राखल्यास या स्पर्धेच्या जगात टिकून राहता येणे शक्य आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपले शंका निरसन केले. हे व्याख्यान विशेषतः कॉम्पुटर शाखेतील तिसऱ्या व अंतिम वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आले होते. या वर्गातील जवळपास शंभर विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. प्रा. मृण्मयी हातिसकर यांनी समन्वयक म्हणून काम पहिले.