कोकण बोर्डात दहावी परीक्षेमध्ये ‘कॉपी’ची एकही घटना नाही!

- गैरप्रकारमुक्त परीक्षेची संस्कृती रुजविणारे कोकण विभागीय मंडळ
रत्नागिरी : दहावीच्या बोर्ड परीक्षेत कोकण विभागीय मंडळात एकही प्रकार मागील पाच परीक्षेत आढळून आला नव्हता. यंदाही तीच परंपरा अबाधित असून विभागीय मंडळात दहावी परीक्षेत कॉपीचा रकाना निरंकच आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळापैकी रत्नागिरीच्या या मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा ही संस्कृती सर्वांच्या सहकार्याने रुजवली आहे. तर बारावी परीक्षेत रत्नागिरीत एका कॉपी प्रकाराची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या अंतर्गत रत्नागिरी येथील कोकण विभागीय मंडळ हे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सन २०१२ पासून कार्यरत असून या विभागीय मंडळात नुकत्याच संपलेल्या फेब्रुवारी मार्च २०२५ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी परीक्षेच्या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यासाठी गैरमार्ग निव्वळ एक प्रकरण भरारी पथकाचे निदर्शनास आले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकही गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले नाही.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी १०० दिवसाच्या कृती कार्यक्रमातील कॉपी विरोधी अभियान या कृतीकार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी या मंडळाकडून पार पाडल्याचे दिसून आले. इयत्ता इ. १० वी व इ.१२वी च्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पाडणे हे आव्हान मंडळासमोर होते.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, प्रधान सचिव रनजीत सिंह देओल ,शिक्षण आयुक्त एस. पी. सिंग, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन मोलाची ठरले आहे. तर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा यांनी दक्षता समिती अंतर्गत भरारी पथकांची निर्मिती करुन प्रत्यक्ष केंद्रांवर राबविलेला धडक कृती कार्यक्रम, प्राचार्य डायट, शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक,योजना, गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी, सर्व कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व त्यांचा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांची मोलाची साथ व त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी घेतलेले विशेष परिश्रम यामुळेचे हे अभियान यशस्वीपणे पार पडून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले.
चालू वर्षी रत्नागिरी दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एम. देवेद्र सिंह व सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. प. रत्नागिरी सुवर्णा सावंत व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. प. सिंधुदुर्ग कविता शिंपी यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी उल्लेखनीय काम काम केले आहे.
कोकण विभागीय मंडळाने स्थापनेपासून कायमच कॉपीमुक्त परीक्षा घेणारे मंडळ म्हणून नावलौकीक प्राप्त केलेला आहे. यावर्षीच्या परीक्षेनंतर त्यामध्ये भरच पडलेली आहे. राज्यातील इतर विभागीय मंडळाशी तुलना करता कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात कोकण मंडळ आघाडीवर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही गैरमार्ग प्रकरण नाही. रत्नागिरीत इयत्ता १२ वी च्या परीक्षेत निव्वळ १ गैरमार्ग प्रकरण भरारी पथकाच्या निर्दशनास आले आहे. ही परीक्षेच्या विश्वासार्हतेसाठी, शिक्षण क्षेत्रासाठी व कोकणातील पालकांसाठी नक्कीच उल्लेखनीय बाब आहे.
कोकण मंडळात इतर मंडळाच्या तुलनेने अगदीच नगण्य कॉपी प्रकार आढळून येतात,या मंडळात कॉपी होत नाही, याच्या कारणांचा बारकाईने आढावा घेतल्यास पुढील वस्तुस्थिती निदर्शनास येते.
१. राज्य मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आयोजित केलेल्या सप्ताहातील सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन म्हणजे शिक्षासूची वाचन, उत्तरपत्रिकेवरील सुचना वाचन, पालक सभा, ग्रामस्थ सभा, प्रभात फेरी उद्बोधनवर्गाचे आयोजन इ. असे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविल्याचे निर्दशनास आले. याचा पालक व विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले.
“कोकणी माणसाची प्रेमळता, निसर्गाने मुक्त हाताने बहार केलेली हिरवीगार वनसंपदा, शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाची सुनिश्चित रचना व भव्यता, सर्वच शिक्षकांचे अध्यापनातील कौशल्य ज्यामुळे निकाल अबाधितपणे अव्वल राहत आहे या सर्व बाबींचा अनुकुल परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, सस्कांरावर नक्कीच होत आहे व ही जमेची बाजू आहे.
-दीपक पोवार,
विभागीय सहसचिव, रत्नागिरी
२. कोकणामध्ये केंद्राबाहेरील उपद्रव असल्याचे कोठेही निदर्शनास आले नाही. ही एक उत्कृष्ट परीक्षा संचालनाची उल्लेखनीय बाब आहे.
३. कॉपीमुक्त अभियानाच्या यशस्वीतेसाठी कोकण विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर,विभागीय सचिव सुभाष चौगुले यांची मंडळ कामकाजावर असणारी मजबूत पकड, दैनंदिन परीक्षा संचालन सुरळित होणेसाठी आवश्यक असणारी दक्षता, दोन्ही जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे व परिरक्षक केंद्रांवर व्यक्तीगत असणारे लक्ष, दररोज भरारी पथकांना व्ही.सी. द्वारे बैठकांचे आयोजन करून दिलेल्या सूचना, दैनंदिन आढाव्यामधून जेथे उणीवा असतील त्याची तातडीने दखल घेवून केलेली पर्यायी व्यवस्था व उपायोजना या बाबी कॉपीमुक्त अभियान यशस्वी होणेसाठी उपयोगी ठरल्या.
“प्राचार्य,मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीक्षा संचालनासाठी विनातक्रार दिलेली सकारात्मक साथ व मंडळाच्या अथक प्रयत्नातून त्यांच्यामध्ये रुजलेली कॉपीमुक्त अभियानाची आत्मयिता व अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी त्यांनी घेतलेले अथक परिश्रम हेही या यशास कारणीभूत आहेत.
–सुभाष चौगुले, विभागीय सहसचिव.
४. मंडळ कार्यालयाने परीक्षा संचलनामध्ये उद्भवलेल्या अडचणी, समस्या यांची तातडीने दखल घेवून क्षेत्रीय यंत्रणांना त्वरित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिल्यामुळे कामात उत्साह दिसून आला. बारावीच्या ऑनलाईन पेपरसाठीही सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते.
“दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समित्यांनी उत्तम भूमिका बजावली आहे. महसूल, पोलीस विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची शिक्षण विभागास मोलाची साथ मिळाली. कोकण विभागात कॉपीमुक्त परीक्षा ही संस्कृती रुजली आहे.
–राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण मंडळ.
५. सर्वात महत्वाचे म्हणजे कोकण विभागीय मंडळाच्या स्थापनेपासून मंडळाचा निकाल सर्व विभागीय मंडळात अव्वल असल्याने तीच पंरपरा पुढे चालू रहावी यातून आपोआप निर्माण झालेली प्रेरणा हे ही या यशाचे गमक आहे.