देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालय सुरू होण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
मुंबई : देवगड तालुक्यातील मत्स्य व्यवसायास चालना देण्यासाठी आणि स्थानिक युवकांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालय ऑगस्ट २०२५ पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने आज मंत्रालयात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत राज्याचे कृषिमंत्री मा. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. बैठकीस कृषी विभागाचे सचिव श्री. विकास रस्तोगी, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मत्स्य महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली अधिसूचना, शासकीय मान्यता, भौतिक सुविधा, अध्यापन कर्मचारी आणि अभ्यासक्रम यावर सविस्तर चर्चा झाली. देवगडमधील स्थानिक पातळीवरील विकास, मत्स्य व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड व शाश्वत रोजगार संधी यासाठी हे महाविद्यालय मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास कृषिमंत्री भरणे यांनी व्यक्त केला.
देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता ही कोकणातील युवकांसाठी सुवर्णसंधी ठरणार असून, या प्रकल्पामुळे संपूर्ण कोकणातील मत्स्य व्यवसायाला नवे बळ मिळणार आहे.