ममता दिनानिमित्त शिवसेनेतर्फे रुग्णांना फळवाटप

उरण (विठ्ठल ममताबादे ) : समस्त शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्व. सौ. मीनाताई ठाकरे यांचा जन्म दिवस सर्वत्र ममता दिन म्हणून साजरा केला जातो. ६ जानेवारी हा दिवस ममता दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या ममता दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
ममता दिनाचे औचित्य साधून उरण तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उरणमधील इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णालय मधील रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबासो कालेल,शिवसेना तालुकाप्रमुख महेंद्र पाटील,शिवसेना उरण शहर प्रमुख सुलेमान शेख,उपशहर प्रमुख दर्शन जळगावकर,सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील व दीपक पाटील,बीजेपी सदस्य ग्रामपंचायत बांध पाडा विश्वास पाटील, सोनखार प्रकल्प ग्रस्त बाधित संघटना अध्यक्ष जयराम ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते सर्वेश ठाकूर, चाणजे पंचायत समिती विभाग प्रमुख कृष्णा पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत म्हात्रे आदी पदाधिकारी कार्यकर्ते, मान्यवर यावेळी उपस्थित होते. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या बाळासाहेबांच्या विचारानुसार सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी शिवसेना (शिंदे गट)चे उरण तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उरण शहर प्रमुख सुलेमान शेख यांनी केले होते.