पटवर्धन प्रशालेचे शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी आकाशवाणीवर झळकणार!

रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर पटवर्धन हायस्कूलच्या चार विद्यार्थ्यांची ‘बालजगत‘ या लहान मुलांच्या कार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे.
इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर पटवर्धन प्रशालेची नित्या संदीप फणसे राज्यात तिसरी, आदित्य महेश दामले राज्यात सहावा, ललित अनंत डोळ राज्यात बारावा आणि मधुरा संजय पाटील राज्यात सोळावी आली आहे.
आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राने शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर झळकलेल्या बालदोस्तांना बालजगत या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात त्यांनी घेतलेली मेहनत, मार्गदर्शन, घरच्यांचा पाठिंबा, वेगवेगळे छंद अशा विविध विषयावर गप्पांवर आधारित असा हा कार्यक्रम आहे. अपयशाने खचून जाऊ नका असा अनमोल संदेशही या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी दिला आहे.
१०१.५ दशांश मेगा हर्ट्झ या एफ. एम. वाहिनीवर आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर 27 जुलै रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.