बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) ची लेखी परीक्षा, माहिती तंत्रज्ञान (I.T.) व सामान्य ज्ञान (G.K.) या विषयाची ऑनलाईन परीक्षा ,माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी ) ची लेखी दि. २१ फेब्रुवारी २०२४ ते दि. २६ मार्च २०२४ या कालावधित होणार असून, परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. असा आदेश अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे.
दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ ते १९ मार्च २०२४ या कालावधित व माध्यमिक तसेच माहिती तंत्रज्ञान (I.T.) व सामान्य ज्ञान (G.K.) या विषयाची ऑनलाईन परीक्षा दि. २० मार्च २०२४ ते दि. २३ मार्च २०२४ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) ची लेखी परीक्षा दि. ०१ मार्च २०२४ ते दि. २६ मार्च २०२४ या कालावधित आयोजित करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल असे कृत्य करण्यात येणार नाही.१०० मीटर परिसरातील एस.टी.डी. बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपनृ इ. माध्यमे आदेशांची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहील.
वरील नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ प्रमाणे, भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.असे ही कळवले आहे.