मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० अंतर्गत ‘दीक्षारंभ’ कार्यक्रम

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करताना “दीक्षारंभ” कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-२०२०) अंतर्गत आयोजित “दीक्षारंभ” या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच सामाजिक-सांस्कृतिक अंगांनी समृद्ध करणे हा आहे.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे डॉ. अनिल पावसे, सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव तसेच डॉ. केतन चौधरी, प्राचार्य, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने वातावरण भारावून गेले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी प्रमुख पाहुणे डॉ. अनिल पावसे सर यांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत केले. त्यानंतर डॉ. चौधरी सर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व ओळख उपस्थितांना करून दिली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नव्या विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख अतिथि डॉ. अनिल पावसे सर यांनी विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक सत्रात डॉ. राकेश जाधव, सहाय्यक प्राध्यापक यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक नियमावली आणि विद्यार्थी परिषद, श्री. सुशील कांबळे, वसतिगृह प्रमुख यांनी वसतिगृहातील शिस्त व नियमावली, श्री. निलेश मिरजकर, सहाय्यक प्राध्यापक यांनी अभासक्रमाची रचना, श्री. यादव, कार्यालय अधीक्षक यांनी शिस्त व विद्यापीठ आचारसंहितेचे नियम, श्रीमती. मयुरी डोंगरे, सहाय्यक अध्यापक यांनी अँटी रॅगिंग नियम यांविषयी सविस्तर माहिती तसेच मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन व त्यांचा दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाअंती चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी मत्स्य अभियांत्रिकी पदविका धारकांच्या मत्स्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. “विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य आणि सकारात्मक वृत्ती” यांच्या जोरावर आयुष्यात यशस्वी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन श्री. निलेश मिरजकर, सहाय्यक प्राध्यापक यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. “दीक्षारंभ” या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक नियमांची माहितीच नव्हे, तर उद्योजकता, सामाजिक जबाबदारी, सहकार्याची भावना व सर्वांगीण विकासासाठी आवश्यक प्रेरणा दिली जात आहे.