मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयामध्ये भात पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प प्रशिक्षण कार्यक्रम

चिपळूण : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथे कृषी विभागाच्या वतीने भात पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पार पडला.
या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश पिकांवर येणाऱ्या कीड व रोगांचा अभ्यास करून, त्याच्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा होता. कृषी विस्तार योजनांमध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, ज्यामुळे शेतीचे नुकसान टाळण्यास मदत होते.
प्रशिक्षणादरम्यान श्री. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी पिकांवरील विविध रोग आणि त्यांच्या नियंत्रणाचे उपाय याबद्दल सखोल माहिती दिली. त्याचबरोबर डॉ. पांडुरंग मोहिते यांनी कीड नियंत्रण कसे करावे याची माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे दिली. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन कीड आणि रोगांचे नमुने दाखवून उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात श्री दत्तात्रय गीते यांनी क्रॉपसॅप अंतर्गत निरीक्षणे कशी घ्यावीत, याबद्दल माहिती दिली. पिकांवरील कीड व रोगांची माहिती घेतल्यानंतर, श्री शिवाजीराव शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी, रत्नागिरी जिल्हा यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. संकेत कदम यांनी विद्यापीठातील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे यावर भर दिला. त्यांनी कृषी विभागाच्या संशोधन कार्याचे आणि शेतकऱ्यांप्रती नवीन तंत्रज्ञान पोहोचवण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, चिपळूण येथील कृषी अधिकारी श्री एस. जी. भिंगार्डे यांनी उपस्थितांचे आभार मानले.