मुंबई गोवा महामार्गावर वाहनाची धडक बसून एक ठार

- अज्ञात वाहनाने ठोकरले
- सकाळी सहाच्या सुमारास भीषण अपघात
रत्नागिरी : मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा येथील ईश्वर धाब्याजवळ आज (रविवार) सकाळी सुमारास सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका नेपाळी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमध्ये हा अपघात घडला असून चालक फरार झाला आहे.
घटनास्थळी तपासाची कारवाई सुरू असताना मृत इसमाच्या खिशातून मिळालेल्या आधार कार्डावरून तो नेपाळी असल्याचे समोर आले आहे. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेद्वारे त्या प्रौढाला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू असून जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी केली आहे.




