मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराचा घाट
- रेल्वे प्रवासी संघटनांकडून विस्ताराला तीव्र आक्षेप
रत्नागिरी : मुंबई ते मडगाव मार्गावर धावणाऱ्या वंदे भरत एक्सप्रेसला ९८ ते १०० टक्के प्रवासी भारमान असतानाही मंगळुरू ते मडगाव मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला अपेक्षित भारमान मिळत नसल्याने मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराचा घाट घातला जात आहे. या हालचालींना मुंबईपासून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गसह गोव्यातूनही मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे.
मुंबई गोवा मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस (२२२२९/२२२३०) मंगळूरूपर्यंत विस्तारित केल्यास हा प्रयत्न हाणून पडण्याची तयारी कोकणातील रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे. यासाठी लोकप्रतिनिधींसह रेल्वे मंत्रालयाला या संदर्भात पत्राद्वारे इशारा देण्यात आला आहे.
मंगळुरु-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला अपेक्षित भारमान मिळत नसल्याची शिक्षा मुंबई-गोवा मार्गावरील प्रवाशांना का?
मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला १००% प्रवासी भारमान असताना त्या गाडीचा विस्तार पुढे मंगळुरुपर्यंत विस्तार करून काहीही सध्या होणार नाही.
दोन्ही मार्गावरील प्रवाशांना स्वतंत्र सेवा देण्यासाठी मंगळुरु – मुंबई दरम्यान नवीन गाडी सुरु करण्याची गरज आहे. त्यासाठी रेल्वे बोर्डाने दक्षिण रेल्वेलाच नवीन वंदे भारत किंवा अमृत भारत किंवा वंदे स्लीपर रेक देऊन त्यांच्या मार्फतच ती गाडी चालवण्यात यावी.
- प्रथमेश प्रभू, रेल्वे प्रवासी आणि कार्यकर्ता.
अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या मंगळूर मडगाव (२०६४५/२०६४६) वंदे भारत एक्सप्रेसला अपेक्षित भारमान मिळत नसल्याच्या कारणामुळे सुरुवातीपासूनच ९८ ते १००% प्रवासी भारमान मिळत असलेली मुंबई सीएसएमटी ते मडगाव ही वंदे भरत एक्सप्रेस मंगळूरपर्यंत विस्तारित करण्याची मागणी दक्षिण कन्नडाचे खासदार नलीन कुमार कातिल यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार रेल्वे मंत्रालयस्तरावर देखील या दृष्टीने विचार होऊ लागला आहे. मात्र, याला कोकणसह गोव्यातून प्रचंड प्रमाणात विरोध होऊ लागला आहे.