मोफत खैर रोपांसाठी १५ ऑगस्टपर्यंत नोंदणी
रत्नागिरी, दि. ७ : पुढील वर्षी २०२५ च्या पावसाळ्यामध्ये ‘खैर रोपे’ मोफत लागवडीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. रोपांची नोंदणी येत्या १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत वन व सामाजिक वनीकरण विभागाकडे करण्यात यावी, असे आवाहन विभागीय उपवनसंरक्षक गिरिजा देसाई यांनी केले आहे.
पुढील वर्षी २०२५ च्या पावसाळ्यामध्ये लागवड करण्यासाठी मोफत रोपांची नोंदणी येत्या १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत वन व सामाजिक वनीकरण विभाग यांना करण्यात यावी. जेणेकरून आवश्यक तालुकानिहाय रोपवाटीकांचे नियोजन करून खैर रोपे वेळेत मोफत शेतकऱ्यांना वाटप करण्यात येतील. खैर रोपांच्या मागणी आणि नोंदीसाठी वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या ८६००५१६४०८, ९५९५६३५१४४ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
जिल्ह्यामध्ये असणाऱ्या अत्यंत पोषक वातावरणामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये खैर प्रजातींच्या रोपांच्या शेतीला चांगल्याप्रकारे वाव आहे. परिपक्व आणि मोठ्या खैर झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग आहे. यामध्ये खैर झाडाच्या लाकडापासून कात तयार होतो. इमारतीसाठी लाकूड, पानांचा उत्तम चारा म्हणून वापर, कोळसा तयार करण्यासाठी, विविध औषधी गुणधर्मावर साल, फुले, डिंक, लाख यांचा वापर होतो. त्यामुळे खैराचे झाड हे कोकणातील नारळीच्या झाडाप्रमाणे कल्पतरु असे आहे. शेतकऱ्यांनी खैर झाडे शेती शाश्वतरित्या केल्यास जिल्ह्यामध्ये कात उद्योगांना चालना मिळेल, स्थानिक लोकांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व इतर जिल्ह्यातून आणि परराज्यांतून खैर लाकूड आयात करावे लागणार नाही.
शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी उत्पन्न देणारा स्रोत
खैर शेतीतून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळून आर्थिक सुबत्ता वाढू शकेल आणि कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्त्रोत शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. खैर रोपांची लागवड प्रती वर्षी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी केल्यास येणाऱ्या काळात जिल्हा खैर लाकडासाठी स्वावलंबी बनेल. सध्या खैर लाकडास प्रती टन रक्कम रु.90 हजार बाजारमुल्य आहे. खैर शेतीसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्यामार्फत शेतकऱ्यांना करण्यात येईल.