रत्नागिरीतील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाला ‘नॅक’ टीमची भेट
रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाला राष्ट्रीय मुल्यांकन व अधिस्वीकृती मंडळाच्या (नॅक) टीमने १७ व १८ मे २०२४ रोजी भेट दिली. यामध्ये टीमचे प्रमुख म्हणून बेंगलोर विद्यापीठाच्या जिओ इंफोर्मेटिक्स विभागाचे प्राध्यापक अशोक हंजगी, टीमचे समन्वयक म्हणून जादवपूर (कलकत्ता) विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्राध्यापक रूप कुमार बर्मन आणि टीमच्या सदस्या म्हणून कोंबा (गोवा) येथील विद्या विकास मंडळाच्या श्री दामोदर एज्युकेशन कॅम्पसच्या प्राचार्या डॉ. प्रीता मल्या सहभागी झाल्या होत्या.
या टीमचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, उपाध्यक्ष डॉ. अलीमिया परकार, कार्यवाह परेश पाडगावकर, सदस्य आत्माराम मेस्त्री, मृत्युंजय खातू, महाविद्यालयाच्या नॅक समन्वयक डॉ. पूजा मोहिते यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
दि. १७ व १८ मे या दोन दिवसांच्या भेटीत या टीमने महाविद्यालयात राबविलेल्या अभ्यासक्रम, अभ्यासक्रमपूरक, व अभ्यासक्रमाव्यतिरिक्त उपक्रमांचा (सामाजिक सहभागाचा), संशोधन, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) तसेच महिला विकास कक्ष या विभागांसह प्रशासकीय, क्रीडा, सांस्कृतिक कामकाजाचा आढावा घेतला. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या या महाविद्यालात कला, वाणिज्य, विज्ञान शाखांतर्गत बीएमएस, बीबीआय, कॉम्प्यूटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान (आयटी), हॉस्पिटॅलिटी स्टडीज असे विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. ‘शिक्षणाच्या हक्कासाठी’ हे ब्रीद घेऊन गेली २५ वर्षे नवनिर्माण शिक्षण संस्था येथे कार्यरत असून, संस्थेची रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू असताना ‘नॅक’ टीमने दिलेली भेट म्हणजे मैलाचा दगड मानला जात आहे.