राहुल रेखावर यांना शिक्षण विभागातून हटवा

- प्राथमिक व माध्यमिक संघटना समन्वय समितीची मागणी
- प्रशिक्षणार्थी व संघटना प्रतिनिधींनी केला निषेध
रत्नागिरी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने राज्यांमध्ये सुरू असणाऱ्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणा दरम्यान वापरण्यात येणाऱ्या हिटलरशाही कार्यपद्धतीचा आज रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक स्तरावरील सर्व संघटना पदाधिकारी, प्रशिक्षणार्थी यांनी निषेध केला व संचालक राहुल रेखावर यांना शिक्षण विभागातून हटविण्यात यावी अशी मागणी एकमताने करण्यात आली.
चिपळूणहून रत्नागिरी येथे प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यासाठी येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या बसला रविवार दिनांक 8 रोजी मोठा अपघात झाला बसमधील शिक्षक व वाहक मिळून 31 लोक जखमी झाले यापैकी जवळपास 04 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक संघटनांनी आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेचे संचालक राहुल रेखावार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु रेखावर यांनी संघटनांना प्रत्यक्ष भेटणे टाळले व फोनवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली.
प्राथमिक व माध्यमिक संघटना समन्वय समितीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशील शिवलकर यांची भेट घेतली यामध्ये काल झालेल्या अपघाताची सर्वस्वी जबाबदारी ही डायटची व एससीआरटीचे असल्याची भूमिका संघटना प्रतिनिधींनी प्राचार्य शिवलकर यांच्यासमोर व्यक्त केली याचबरोबर एक तासाची हजेरी व ऑनलाईन मूल्यमापन तात्काळ बंद करण्यात यावे तसेच अपघात ग्रस्त शिक्षकांना आर्थिक मदत देण्यात यावी व त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून घेण्यात यावे अशी मागणी समन्वय समितीच्या वतीने प्राचार्य शिवलकर यांच्याकडे करण्यात आली. याबाबत प्राचार्य शिवलकर यांनी संचालक राहुल रेखावार यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून देऊन संघटनांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे प्रयत्न केला परंतु संघटना प्रतिनिधींचा यामुळे समाधान झाले नाही. आक्रमक संघटना प्रतिनिधींनी डायट प्राचार्य यांच्या समोर आपण रत्नागिरी जिल्ह्यातील असूनही आपल्याला जिल्ह्याची भौगोलिक रचना माहित नाही का ? प्रशिक्षण दोन ते तीन ठिकाणी का आयोजित करण्यात आले नाही ? असे प्रश्न उपस्थित केले.
यानंतर उपस्थित सर्व संघटना प्रतिनिधींनी प्रशिक्षण स्थळांना भेट दिली. यावेळी सागर पाटील, दीपक शिंदे, चंद्रकांत पावसकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला व संघटनांची भूमिका प्रशिक्षणार्थी अध्यापकांसमोर स्पष्ट केली. सर्वच प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने व सर्व संघटनांच्या वतीने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या अमानवी पद्धतीचा निषेध करण्यात आला याचबरोबर राहुल रेखावार यांना शिक्षण विभागातून हटवण्यासंदर्भातली मागणी एकमुखाने करण्यात आली.
यावेळी अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे दिलीप देवळेकर , शिक्षक समितीचे दीपक शिंदे , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे विश्वनाथ डवरी, माध्यमिक कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे, अध्यापक संघाचे उपाध्यक्ष सुशांत कविस्कर, शिक्षक भारतीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पात्रे, सचिव निलेश कुंभार, शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष राहुल सप्रे, शिवछत्रपती संघटनेचे अध्यक्ष राजेश जाधव, शिक्षक परिषद संघटनेचे सचिव पांडुरंग पाचपुडे, प्राथमिक शिक्षक पदवीधर संघटनेचे चंद्रकांत पावसकर, शिक्षक परिषद संघटनेचे प्रकाश काजवे , प्राथमिक शिक्षक संघाचे संतोष रावणंग, चंद्रकांत कोकरे, प्राथमिक पतपेढी चे अध्यक्ष संतोष कांबळे, जुनी पेन्शन संघटनेचे अंकुश चांगण,राजेश शिर्के, सचिन मिरगल, पी एस नाईक, भारती शिंदे व अन्य संघटना प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.