शेतकरी कुटुंबातील मुलाची नवोदय विद्यालय राजापूर येथे निवड
लांजा : ‘न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं’ हे वाक्य शेतकरी कुटुंबातील वेद विजय पिलके याच्यासाठी तंतोतंत लागू पडतं. कारण 20 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षेची दुसरी यादी प्रसिद्ध झाली. या यादीमध्ये PM Shree School व राज्यस्तरीय आदर्श शाळा लांजा नं. 5 शाळेचा विद्यार्थी वेद विजय पिलके याची निवड झाली आहे.
विशेष म्हणजे वेद ने हे यश कोणताही ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास न लावता फक्त आणि फक्त शाळेत शिकवलेला अभ्यास व स्वतः अभ्यास करून खेचून आणले आहे. वेद हा खावडी पिलकेवाडी चा असूनं त्याचे आई – वडील शेतकरी आहेत. मुलाला चांगले शिक्षण मिळावे, मोठ्या शाळेत शिकायला मिळावे, म्हणून आपल्या पोटाला चिमटा काढून मुलाला दररोज 16 किलोमीटर प्रवास करत शाळेत सोडत होते. हा नित्यक्रम इयत्ता 1 ली पासून इयत्ता 5 वी पर्यंत सुरु होता.. ऊन, पाऊस, वारा असो वा सकाळची शाळा वेद ने कधी शाळेला दांडी मारली नाही. अभ्यासाची आवड, जिंकण्याची इच्छा, अथक परिश्रम करण्याची नेहमी तयारी या गुणामुळेच त्याला हे यश मिळाले आहे.
गरीब, हुशार, होतकरू मुलांना चांगले व मोफत शिक्षण मिळावे, या उद्देशाने नवोदय विद्यालय स्थापन केली आहेत..या वर्षी वेद सारख्या अनेक मुलांची निवड झाल्याने हा उद्देश सफल होतं आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.
वेदला वर्गशिक्षक श्री. अमित जाधव, सौ. मयुरी पालकर व गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण, शाळेतील सर्व शिक्षक व शा. व्य. समिती अध्यक्ष व सदस्य तसेच सर्व पालकांनी अभिनंदन केले. तसेच सर्वच स्तरातून वेद वर कौतुकाचा वर्षाव होतं आहे.