संगमेश्वर-देवरुख मार्गावर तयार झाली ‘चंद्रविवरं’!
- दररोज घडत आहेत अपघात
- बांधकाम विभागाने घेतले झोपेचे सोंग
- अनेक दुचाकी चालक जखमी
संगमेश्वर दि. ८ : संगमेश्वर देवरुख राज्यमार्ग आता वाहने चालवण्यास योग्य राहिला नसून या मार्गावर तयार झालेली चंद्रविवरं पाहता प्रवाशांना , वाहना ऐवजी आता यानातून प्रवास करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. वाहनातून प्रवास केल्यास इच्छित स्थळी पोहोचण्या ऐवजी , इहलोकीच्या प्रवासाला जावे लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. कमालीची सहनशक्ती असलेले वाहनचालक, झोपेचे सोंग घेतलेला बांधकाम विभाग आणि प्रवासी असो अथवा स्थानिक ग्रामस्थ यांना गृहीत धरून आपला राजकीय प्रवास करणारे लोकप्रतिनिधी अशा व्यवस्थेमुळे दररोज अपघात घडत असून वाहनांचे नुकसान होत आहेच, शिवाय असंख्य दुचाकी चालक खड्ड्यात पडून जखमी होत आहेत.
या मार्गाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभाग एखाद्या बळीचा मुहूर्त साधण्याची वाट पाहत आहे का ? असा संतप्त सवाल वाहन चालकांनी उपस्थित केला आहे.संगमेश्वर ते बुरंबी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे.या रस्त्यावरून वाहने चालवणाऱ्या चालकांना तारेवरची जीवघेणी कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत. तर प्रवाशांना सुद्धा जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. मात्र सबंधिताना याचे कोणतेच सुख दुःख नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वातानुकुलीत शासकीय कार्यालयातील आरामदायी खुर्चीवर बसून प्रशासकीय कारभाराचा गाडा हाकणाऱ्या सबंधितांना सर्व सामान्य जनतेची चिंताच नसल्याने नसून जनतेतून तीव्र संतापाची लाट पसरली आहेएखादा मोठा अपघात होऊन जीवित हानी झाल्यानंतरच खड्डे भरण्याची तसदी घेतील का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. देवरुख हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी तहसील ते पंचायत समिती आदी शासकीय कार्यालय असल्याने शासकीय कामांसाठी जाणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच संगमेश्वर पासून अवघ्या दीड की. मी. अंतरावर लोवले येथे नवनिर्माण जुनियर, सिनियर कॉलेज असून या ठिकाणी व त्यापुढील बुरंबी दादा साहेब सरफरे विद्यालय व देवरुख येथील कॉलेज, शाळेसाठी जाणाऱ्या विध्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी नसून जुनियर, सिनियर च्या लहान चिमुकल्या मुलांन पासून शाळा, कॉलेज मुलांची संख्याही मोठी आहे. मात्र संगमेश्वर पासून बुरंबी पर्यंत रस्त्यावर ठिकाठिकाणी अमिबा प्राण्याच्या आकाराचे भलेमोठे खड्डे पडले असल्याने यातून वाहने चालवताना वाहन चालकांना तारेवरची जीवघेणी कसरत करावी लागते त्या प्रमाणे जीवावर उदार होऊन तर प्रवासी व शाळा कॉलेज विध्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन खड्ड्यातील हादरे सहन करतच प्रवास करावा लागत आहे.
काही ठिकाणी तर खड्ड्यांच्या पसरलेल्या साम्राज्यामुळे एक खड्डा चुकवला तर दुसरे चाक हे शंभर टक्के खड्ड्यात जाणारच कारण रस्त्याची चाळणच झाली आहे.
संगमेश्वर – देवरुख या मार्गावर दररोज असे अपघात घडत असून स्थानिक ग्रामस्थांनी बांधकाम विभागाशी संपर्क साधल्यानंतर थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ निभावून नेली जात आहे. केवळ महिन्याभरावर येऊन ठेपलेला गणेशोत्सव पाहता काही दिवसातच या मार्गावरून वाहनांची वर्दळ आणखी वाढणार आहे. अशा स्थितीत या मार्गाची तातडीने दुरुस्ती न केल्यास वाहन चालक रस्त्यावर उतरुन सार्वजनिक बांधकाम विभागा विरोधात आंदोलन करतील.
–परशुराम पवार, प्रवासी संघटना पदाधिकारी, संगमेश्वर
अपघाताला निमंत्रण देणाऱ्या या खड्डयामध्ये पावसाचे पाणी साचल्यावर खड्ड्यांचे अंदाज न आल्याने काही दुचाकिंचे अपघात झाल्याची सुद्धा ओरड सुरु आहे. राज्यात व जिल्ह्यात खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडून जीवित हानी तसेच काही लोकांना कायमचे जायबंदी झाल्याच्या घटना घडल्या असून तशी घटना होण्याची प्रतीक्षा सबंधित विभागाने न करता नावापुरते खड्ड्यांवर मलम पट्टी न करता खड्डे भरण्याची तसदी घेण्याची खरी गरज आहे.लोवले येथे मुंबईहून देवरूखला जाणारी एक वॅगन आर कार या खड्ड्यात आपटल्याने कारचे दोन्ही टायर फुटून, डाव्या बाजूच्या दोन्ही रीम वाकड्या झाल्या. कार चालकाने कशीबशी आपली गाडी रस्त्याच्या बाजूला लावली आणि दोन दिवसानंतर दोन नवीन रिम आणि टायर घेऊन तो आपली गाडी व्यवस्थेला लाखोली वाहत घेऊन गेला. याच खड्ड्यात रात्रीच्या वेळी देवरूखहून संगमेश्वर ला येणारा दुचाकी चालक पडल्याने तो देखील गंभीर जखमी झाला.
औषध दुकानासमोर चंद्रविवरं !
संगमेश्वर देवरुख राज्य मार्गावर बुरंबी बस थांब्याच्या नजीक असणाऱ्या एका औषध दुकानासमोरच रस्ताच शिल्लक राहिला नसून येथे चंद्राविवरं तयार झाली आहेत. वयोवृद्ध रुग्णांना या औषध दुकानात जाताना अक्षरश : जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.