महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण

‘स्मृतिशलाका’ ही भारतीय संस्कृतीच्या उन्नयनाचा मार्ग दाखवणारी स्मरणिका : पद्मश्री दादा इदाते

  • अलोरेतील आगवेकर विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी प्रकाशन सोहळ्यात प्रतिपादन

चिपळूण : तालुक्यातील अलोरे शाळेच्या ‘स्मृतिशलाका’ या स्मरणिकेतून ‘एका गावची कथा’ (गोष्ट) आपल्या समोर येते. ती समजून घेण्यासारखी आहे. आपल्या देशात जवळपास सहा लाख गाव-खेडी आहेत. तितक्या कथा आहेत, पार्श्वभूमी आहे. त्यामुळे अशा सहा लाख गोष्टीरूप ग्रांथिक साहित्य साकारलं जाऊ शकतं. यातून आपण कोण आहोत? हे आपल्याला समजेल. ‘स्मृतिशलाका’ हा मौल्यवान ग्रंथ झाला आहे. वरवर पाहाता ही वाटचाल एका शिक्षण संस्थेची, शाळेची आणि गावाची असं असलं तरी ती वाटचाल भारतीय संस्कृतीच्या उन्नयनाचा मार्ग दाखवणारी आहे, असे प्रतिपादन ‘पद्मश्री’ दादा इदाते यांनी केले.

अलोरेतील मोरेश्वर आत्माराम आगवेकर विद्यालय विद्यालय आणि सीए. वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालय अलोरे (पूर्वाश्रमीचे अलोरे हायस्कूल अलोरे) शाळेच्या १५२ रंगीत पानांसह ४३६ पानी ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचा प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शाळेचे पालक सीए. वसंतराव लाड, सौ. अलका लाड, सौ. ऋजुता व श्री. अमित मोरेश्वर आगवेकर, परशुराम एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मकरंद जोशी, उपाध्यक्ष साईनाथ कपडेकर, कोषाध्यक्ष विजयकुमार ओसवाल, अलोरे शाळा समिती चेअरमन पराग भावे, स्मरणिकेचे संपादक धीरज मच्छिन्द्रनाथ वाटेकर, निर्माते व शाळा संस्था समन्वयक अरुण केशव माने व शशिकांत शंकर वहाळकर, प्रकाशक व मुख्याध्यापक विभाकर विश्वनाथ वाचासिद्ध, ज्येष्ठ शिक्षक रामचंद्र खोत आदी होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘पद्मश्री’ दादा इदाते यांचा सत्कार शाळेचे पालक सीए. वसंतराव लाड यांच्या हस्ते करण्यात आला. अलोरेचा वर्तमानकाळ, भूतकाळासह अमृतकाळाचा वेध घेणारी ‘स्मृतिशलाका’ स्मरणिका बौद्धिक स्मरण रंजन करणारी असल्याने प्रकाशनार्थ स्मरणिकेत लेख लिहिणारे आजी विद्यार्थी हर्ष मोहिते व सुजल साळवी यांच्या खांद्यावरून पालखीतून नकारात्मकता दूर करण्याचे गुण असलेल्या सोनपाकळ्यांच्या सान्निध्यात स्मरणिकेचे व्यासपीठावर आगमन होऊन प्रकाशन करण्यात आले.

यावेळी इदाते पुढे म्हणाले, एका संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षीच्या निमित्ताने एक संग्राह्य, महत्वपूर्ण दस्तऐवज केला आहे. स्मरणिका बनवताना खूप तपशिलात विचार केला आहे. शाळेच्या, गावाच्या दृष्टीने ही स्मरणिका अमूल्य अलौकिक ठेवा, संदर्भ ग्रंथ आहे. प्रत्येक काळाची कथा ही अशीच असते. भारतातील खेडं हे एक प्रातिनिधीक रूप आहे. भारतातील गावागावात, गांभीर्य, खोली, विविधता आहे. अलोरे शाळेच्या ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेतून पुढे आलेली ‘एका शाळेची गोष्ट’ ही अशाच एका भारतीय खेड्याचे रूप आहे. चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटीची शाळा अलोरेत येण्यात जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांचा खूप मोठा वाटा राहिला आहे. त्याकाळात आपल्या देशाचा मूलभूत संस्कार देणाऱ्या शिक्षणसंस्था उद्धवस्त झालेल्या होत्या. इंग्रजी बाबू तयार होतील असं शिक्षण आणि तशा संस्थांना पाठबळ मिळत होतं. अशावेळी अलोरेत ही संस्था येणं खूप मोठी उपलब्धी ठरलं. खरंतर आपल्याकडे शिक्षणाच्या माध्यमातून अनावश्यक शिकवलं गेल्याने अडचणी निर्माण झाल्यात. अशी मांडणी इदाते यांनी केली. लॉर्ड मेकालो यांनी आणलेल्या शिक्षण पद्धतीने कसे दुष्परिणाम झाले याचेही वर्णन त्यांनी केले. आम्ही कोण आहोत? हे आम्हाला कळेनासे झाले होते. तो काळ आता मागे पडला आहे. शोध घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे आज स्पष्ट दिसते आहे. आपला देश केवळ सदिच्छेने नव्हे तर प्रत्यक्ष कृतीने बदलत आहे. परिवर्तन होत आहे. हे जाणवत असल्याचे इदाते यांनी नमूद केले.

नेतृत्वाच्या आशेने जग भारताकडे पाहातंय – सीए. वसंतराव लाड
शाळेचे पालक सीए वसंतराव लाड यांनी ‘जगाच्या अर्थव्यवस्थेतील भारताचे स्थान’ या विषयावर आपले विचार मांडले. ते म्हणाले, भारत आज खूप उन्नती करत आहे. जागतिक ब्रिक्स संघटनेची वाढ या विषयातील भारताचे योगदान, जगाला व्हक्सिन पुरवठा करण्याची क्षमता, धोकादायक चीनच्या पार्श्वभूमीवर उर्वरित जग नेतृत्व म्हणून भारताकडे पाहतोय. आज भारत जगातील मोठी पाचवी अर्थसत्ता आहोत. तिसऱ्या मोठया अर्थसत्तेच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. आजचा भारत जागतिक उत्पादक ठरला आहे. जागतिक बाजारपेठेत औषधांचे माहेरघर हैद्राबाद बनले आहे. जागतिक आयटी सेक्टर बेंगलोरला आहे. भारत देश जगासाठी आज आपण अँपल फोन बनवतो आहोत. आजच्या जागतिक बाजारपेठतील अनेक मोठ्या कंपन्या जागतिक उत्पादनासाठी भारतात येत आहेत. यासाठी लागणारं मनुष्यबळ हे कुशल हवे आहे. म्हणून शिक्षण पॉलिसीत बदल होत आहेत. कोरोनानंतर फक्त चीनवर अवलंबून न राहाता पर्याय म्हणून जग भारताकडे पाहाते आहे. भारत झपाट्याने बदलतो आहे. दळणवळणाने वेग घेतलेला आहे. ‘उडाण’ हा पंतप्रधान मोदी यांनी आणलेला कार्यक्रम महत्वाचा आहे. बरेचसे देश कर्जावर अवलंबून असतात. आपल्या देशालाही १९९१च्या काळात आर्थिक अडचणीस्तव वीस टन सोने विकावे लागले होते. अशातून आपण आपल्या देशाला वाचवलं होतं. आज आपले सहा हजार लाख रुपये ठेव स्वरूपात आहेत. म्हणजे आपला देश प्रगतीच्या मार्गावर आहे. वीजेवर चालणाऱ्या सर्वाधिक गाड्या भारतात तयार होत आहेत. भारतात काश्मिरमध्ये चित्र बदलतंय. पाकिस्तानची आजची स्थिती भयंकर वाईट आहे. जीवनावश्यक वस्तूंची कमतरता आहे. कलम३७० कुणाला हवं होतं? सामान्य माणसाला प्रगती, रोजगार हवा होता. आज जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. भारताला दुखावणे जगाला परवडणारे नाही. अबुधाबीमध्ये फेब्रुवारीत मोठ्या मंदिराचे उद्घाटन होत आहे. ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेत मांडलेले अलोरे प्रशंसनीय आहे. या स्मरणिकेचे महत्त्व खूप आहे. अलोरेची प्रकल्पीय वाटचाल १९६३ ते २०२३ अशी साठ वर्षांची आहे. गजबजण्याच्या पूर्वीच्या अलोरेतील आठवणीना लाड यांनी उजाळा दिला.

‘स्मृतिशलाका’ म्हणजे ग्रामीण शालेय स्मरणिकांच्या इतिहासात वेगळी वाट दाखवणारा ‘दिवा’ – वाटेकर
महाराष्ट्राच्या ग्रामीण शालेय स्मरणिकांच्या आजवरच्या इतिहासातील एक वेगळी वाट चोखाळणारा दिवा अलोरे शाळेने आज प्रज्ज्वलित केला आहे. या वाटेवरून चालणाऱ्या भविष्यातील पांथस्थाला या शालेय क्षेत्रातील उजेडाचा दिलासा देण्याचं काम ही स्मरणिका करेल. असा विश्वास ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचे संपादक धीरज वाटेकर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, दुतर्फी वाशिष्ठी नदीच्या काठावर वसलेले अलोरे गाव ‘जावळी’तील इतिहासप्रसिद्ध राजे चंद्रराव मोरे यांच्यापैकी कोणा अज्ञात शाखापुरुषाने वसवलेले गाव आहे. गावचे ग्रामदैवत स्वयंभू श्रीशंकर, श्रीगंगादेव मंदिराच्या आवारात चंद्रराव मोरे यांचे स्मृतिमंदिर आहे. कोकणात अशा प्रकारचे स्मृतिमंदिर इतरत्र कोठेही नसावे. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणी काळात, १९६०नंतर दोन्ही बाजूंनी वाशिष्ठी पात्राची सोबत लाभलेल्या अलोरे पंचक्रोशीस ‘वाशिष्ठीनगर’ नावाने ओळखले जात होते. १९व्या शतकात अलोरेत वास्तव्य केलेल्या अनेकांसाठी इथल्या चाळवजा वसाहत संस्कृतीतील जगणे आणखी काही वर्षांनंतर एक दंतकथा बनून राहील इतके एकमेकांत मिसळलेले होते. अलोरे शाळा आज सातत्याने आठवावी लागते. कालौघात अशा शाळा दुर्मीळ झाल्या आहेत. म्हणून शाळेच्या अनुषंगाने होणाऱ्या डॉक्युमेंटेशनला महत्व आहे. घटना, वास्तव आणि सत्य समजून घेऊन आपण ‘स्मृतिशलाका’ स्मरणिका संकलन-संपादन केले आहे. आपल्या कार्यसंस्कृतीचं संचित पुढच्या पिढीच्या हातात सुरक्षितपणे पोहोचावं हाही हेतू यामागे असल्याचे ते म्हणाले. ही स्मरणिका म्हणजे महाराष्ट्रातील अवघ्या दीड टक्का म्हणजे ३५ हजार ८९९ गावांपैकी खेड्यांसह ५३६ गावात वीजपुरवठा होत होता, तेव्हाची ही गोष्ट आहे. अलोरे गावाच्या विकासामागे असलेल्या १८७६-७८च्या दुष्काळापासून कोयना प्रकल्पाच्या आगमनापर्यंतच्या संपर्ण इतिहासाचे वर्णन वाटेकर यांनी केले.

शाळेतील सातव्या इयत्तेची विद्यार्थीनी सृष्टी प्रदीप शिंदे, ज्येष्ठ माजी विद्यार्थी सुरेश पालांडे, ज्येष्ठ शिक्षक रामचंद्र खोत, प. ए. सोसायटीचे कोषाध्यक्ष विजयकुमार ओसवाल यांनी मनोगत व्यक्त केले. अलोरे संदर्भात अप्रतिम काम या स्मरणिकेने केले असल्याची भावना प्रमुख पाहुणे अमित मोरेश्वर आगवेकर यांनी व्यक्त केली. दादा इदाते यांचा परिचय शशिकांत वहाळकर यांनी करुन दिला. ‘विकसित व्हावे अर्पित होऊनि जावे’ हे गीत चंद्रकांत राठोड यांनी सादर केले. सूत्रसंचालन सौ. देवकी लाड यांनी केले. आभार प्रदर्शन करताना शाळेचे मुख्याध्यापक विभाकर वाचसिद्ध यांनी ‘विचाराच्या निष्ठेला न्याय देण्यासाठी दादा इदाते आल्याचे नमूद करत उपस्थित इतर मान्यवरांचे आभार मानले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button