ज्ञान प्रबोधिनी क्रीडाकुल व टाटा ट्रस्ट्सचा ग्रामीण खेळाडू घडवण्याचा निर्धार!
३०० हून अधिक सर्वोत्तम खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला
चिपळूण : ग्रामीण भागातील क्रीडाप्रतिभा ओळखून त्यांना संघटित प्रशिक्षण देण्यासाठी ज्ञान प्रबोधिनी क्रीडाकुल व टाटा ट्रस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने “ग्रामीण खेळाडू विकसन प्रकल्प” राबवला जात आहे. महाराष्ट्रातील ४ केंद्रांवर हा उपक्रम सुरू असून, १६०० हून अधिक खेळाडू रोज नियमित सराव करतात. ग्रामीण स्तरावरून तंदुरुस्त आणि सक्षम खेळाडू घडवण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रकल्पातील खेळाडूंसाठीची वार्षिक आंतरकेंद्रीय स्पर्धा दि. ९ व १० डिसेंबर रोजी चिपळूण-डेरवण येथे बँक ऑफ महाराष्ट्र व मातृमंदिर विश्वस्सहकार्यामधून पार पडली. चार केंद्रांमधील निवडलेल्या ३०० हून अधिक सर्वोत्तम खेळाडूंनी स्पर्धेत सहभागघेतला.
खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल आणि अॅथलेटिक्स मध्ये १०० मी, १५०० मी आणि गोळा फेक या क्रीडा प्रकारांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. सर्वांगीण कामगिरीच्या निकषावर चिपळूण केंद्र हे सर्वोत्कृष्ट केंद्र ठरले.
स्पर्धेदरम्यान खेळाडूंना झालेल्या दुखापतींवर तत्काळ उपचार करण्यासाठी वैद्यकीय टीम दोन्ही दिवस सतत उपस्थित होती.
समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत, बी.के.एल. वालावलकर फिजिओथेरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर एल., डॉ. नेताजी पाटील, टाटा ट्रस्ट्सच्या क्रीडा विभाग प्रमुख नीलम बाबरदेसाई, डेरवण क्रीडा संकुल प्रमुख श्री. श्रीकांत पराडकर, क्रीडाकुलचे संस्थापक व प्रकल्प प्रमुख डॉ. मनोजराव देवळेकर, ज्ञान प्रबोधिनी चिपळूण केंद्र प्रमुख स्वानंद हिर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण खेळाडू विकसन प्रकल्पाचे व्यवस्थापक संकल्प थोरात, हेड कोच आकाश कटले, क्रीडा मानसतज्ज्ञ आभा देशपांडे, स्वप्ना, कबड्डीचे राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक सोनावणे सर, चिपळूण केंद्राचे केंद्र समन्वयक तुषार कदम,
कोच विशाल सुर्वे आणि ३५ हून अधिक क्रीडा प्रशिक्षक व पंचांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.
क्रीडा हे केवळ मौजमजेचे नाही तर राष्ट्रनिर्मितीचे साधन आहे. शिस्त, संघभावना, तंदुरुस्ती आणि नेतृत्वगुण क्रीडेमधून घडतात. जगातील अनेक राष्ट्रे आपल्या क्रीडा कामगिरीमुळे आघाडीवर आहेत. भारताने ऑलिंपिकसारख्या मंचावर अजूनही अपेक्षेइतकी कामगिरी केलेली नसली, तरी ग्रामीण भागातील प्रतिभेला योग्य संधी मिळाल्यास भविष्य उज्ज्वल आहे, असे या प्रकल्पातून स्पष्ट दिसते. ग्रामीण खेळाडू विकसन प्रकल्पामुळे अनेक गुणवंत खेळाडू घडत आहेत आणि भविष्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू याच प्रकल्पातून पुढे येतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.





