कोकण रेल्वे झाली आणखी वेगवान!
चार सुपरफास्ट गाड्यांचा वेग प्रति तास 110 वरून 120 वर
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या दोन राजधानी एक्सप्रेस तसेच मुंबई ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी आणि तेजस एक्सप्रेस अशा चार सुपरफास्ट गाड्यांची वेगमर्यादा प्रति तास एकशे दहा किलोमीटर वरून प्रति तास 120 किलोमीटरपर्यंत वाढवण्यास मंजुरी मिळाली आहे. दिनांक 22 मे पासून कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर तसेच ठोकूर ते वीर या सेक्शनमध्ये वेग मर्यादा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
हजरत निजामुद्दीन ते त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस ( १२४३२ ), त्रिवेंद्रम ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (१२४३१ ), हजरत निजामुद्दीन ते मडगाव गोवा राजधानी एक्सप्रेस (२२४१४), मडगाव ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (२२४१३ ), सीएसएमटी मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस (12051), मडगाव सीएसएमटी (12052) जनशताब्दी एक्सप्रेस, सी एस एम टी मडगाव तेजस एक्सप्रेस (22 119), मडगाव- सीएसएमटी (22120) तेजस एक्सप्रेस या चार सुपरफास्ट श्रेणीतील गाड्या कोकण रेल्वे मार्गावर धावताना आता आणखीन वेगवान होणार आहेत.
या गाड्यांचा एम पी एस ( मॅक्झिमम परमिसीबल स्पीड) कोकण रेल्वे मार्गावर असताना प्रति तास एकशे दहा किलोमीटर इतका होता. तो आता कोकण रेल्वेच्या सेक्शनमध्ये 120 पर्यंत वाढवण्यात आला आहे.