ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
Mumbai-Goa highway | कशेडी भुयारी मार्गाजवळ दुसऱ्यांदा दरड कोसळली
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक एकाच लेनवर

खेड : कशेडी भुयारी मार्गाच्या आधी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी मुसळधार पावसामुळे पुन्हा यावर्षीच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा दरड कोसळली आहे. या दरडीमुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गीकेवरील वाहतुकीत व्यत्यय आला. या घटनेमुळे वाहतूक एकाच लेनवरून वळवण्यात आली आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहनांची वर्दळ विस्कळीत झाली असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या ठिकाणी काही दिवसांपूर्वीही जोरदार पावसामुळे दरड कोसळली होती. त्याच परिसरात मंगळवारी पुन्हा दरड कोसळल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. सकाळी दरड कोसळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि खेड तालुका प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरड हटवण्यासाठी जेसीबी व अन्य यंत्रसामग्रीच्या मदतीने युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून, दोन्ही लेनवरील वाहतूक पूर्ववत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तोपर्यंत वाहनांची वाहतूक एकाच लेनवरून सुरु ठेवण्यात येत आहे. परिणामी महामार्गावर काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.