Scholarship : चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी
- विद्यार्थ्यांनी www.mscepune.in व https://puppssmsce.in यावर अर्ज करावेत
रत्नागिरी : प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.4थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (Scholarship) परीक्षेस (इ.7 वी) प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दि. 30 डिसेंबर 2025 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. परीक्षा दि. 26 एप्रिल, 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती संकेतस्थळावरील अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. अधिसूचनेतील प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केले आहे.
सुधारीत शासन निर्णयानुसार पूर्वी इयत्ता 5 वी व 8 वी साठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परिक्षा आता अनुक्रमे 4 थी व 7 वी साठी घेतली जाणार आहे. सन 2025-26 हे संक्रमण वर्ष असेल, ज्यात जुन्या (इ. 5 वी व 8 वी ) आणि नवीन (इ. 4 थी व 7 वी ) दोन्ही इयत्तांच्या परिक्षा होतील. इयत्ता 4 थी साठी शिष्यवृत्तीची दरमहा 500 रूपये तर 7 वी साठी शिष्यवृत्तीची रक्कम दरमहा 750 तीन वर्षांसाठी असेल. ही परिक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलगु, कन्नड या माध्यमांमध्ये देण्यात येऊ शकते. बिगरमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी रु. 200/- तर मागासवर्गीय/दिव्यांगांसाठी रु.125/- परीक्षा शुल्क असेल. प्रत्येक शाळेला रु.200/- शाळा नोंदणी शुल्क भरावे लागेल.
परिक्षेला बसण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. शासनमान्य (सरकारी/अनुदानित/खासगी) शाळेत इ.4 थी किंवा 7 वीमध्ये शिकत असावा. इ.4 थीसाठी कमाल 10 वर्षे (दिव्यांगांसाठी 14 वर्षे), इ. 7वीसाठी 13 वर्षे (दिव्यांगांसाठी 17 वर्षे) वयोमर्यादा असेल. प्रत्येक पेपरमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक असेल. सीबीएसई किंवा आयसीएसई अभ्यासक्रमाचे विद्यार्थी परिक्षेच्या गुणवत्ता यादीत येतील पण त्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार नाही.
सदरची अधिसूचना www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.





