रत्नागिरी अपडेट्स

पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

रत्नागिरी, दि.११ : राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक 2023 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज संपन्न झाली.


बैठकीला आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी, विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. प्रमोद सावंत, कृषी विद्यावेत्ता नारळ संशोधन केंद्र भाट्ये डॉ. के.व्ही.मालशे आदी उपस्थित होते.


यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले, जिल्ह्यातील 66 हजार हेक्टर क्षेत्र हे भातपीक लागवडीचे आहे. या क्षेत्रामध्ये भाताची लागवड करणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना भातपिकाचे मोफत बियाणे पुरविण्यात येईल. याकरिता 1 कोटी 44 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बी-बियाणे योग्य वेळेवर मिळण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून खरीप हंगामाचे नियोजन करावे. जिल्ह्यात आंबा, काजू, भात या पिकांसह नाचणी, हळद यासारख्या पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. शेती उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने आंबा फळावरील रोग निवारणासाठी संशोधन करावे तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कोकण कृषी विद्यापीठाने प्रशिक्षण केंद्र तयार करुन या प्रशिक्षण केंद्रामार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. शासनामार्फत जास्तीत जास्त भात खरेदी करण्यात यावी, जेणेकरुन शेतकरी भातपिक लागवडीसाठी प्रोत्साहित होतील. कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात काजू बागायतदारांचा मेळावा आयोजित करावा, अशा सूचनाही यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.


जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुऱ्हाडे यांनी जिल्ह्यातील पिकांची लागवड, फळपिक उत्पादन, पर्जन्यमान तपशिल, प्रमुख पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता, फळबाग लागवड, सिंचन याबाबतची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जिल्ह्यात आयोजित झालेल्या उपक्रमांची माहिती श्रीमती कुऱ्हाडे यांनी यावेळी दिली.
बैठकीला जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी, मत्स्य व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button