भाजपा संगमेश्वर (दक्षिण) महिला मोर्चाची धुरा स्नेहा फाटक यांच्या हाती

देवरुख : भारतीय जनता पार्टी संगमेश्वर (दक्षिण) तालुक्याची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून महिला मोर्चा तालुकाध्यक्ष म्हणून देवरुख शहरातील सौ. स्नेहा राहुल फाटक यांची निवड झाली आहे.
यापूर्वी महिला मोर्चामध्ये देवरुख शहराच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्या कामगिरीचा आलेख आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची गुणवत्ता पाहून भाजपा रत्नागिरी (द.) जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, सरचिटणीस श्री. अमित केतकर, सौ. संगीता जाधव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी, संगमेश्वर-चिपळूण विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव, तालुकाध्यक्ष श्री. रूपेश कदम तसेच जिल्हा कार्यकारिणीतील अन्य पदाधिकाऱ्यांनी ही निवड केल्याचे जाहीर करण्यात आले.
सौ. स्नेहा फाटक एक लघुउद्योजिका म्हणून देवरुख परिसरात प्रसिद्ध आहेत. वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर फॅशन फोटोग्राफी विषयात डिप्लोमादेखील केला आहे. रोट्रॅक्ट क्लब, पनवेलच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम केल्यानंतर देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध उपक्रमांत त्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले योगदान दिले आहे. भाजपा देवरुख शहराध्यक्ष म्हणून त्यांनी महिलांसाठी अनेक उपक्रम राबवून उत्तम संघटन कौशल्य सिद्ध केले आहे.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सौ. फाटक म्हणाल्या, “राष्ट्रगौरव पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी साहेब यांच्या प्रेरणेने, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रेरणेने महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. वनाथी श्रीनिवासन, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ, उपाध्यक्षा सौ. वर्षाताई भोसले, प्रदेश सचिव सौ. शिल्पाताई मराठे आणि जिल्हाध्यक्षा सौ. सुजाताताई साळवी तसेच जिल्हा सरचिटणीस सौ. संगीताताई जाधव, देवरुखच्या माजी नगराध्यक्षा सौ. स्वातीताई राजवाडे व सौ. मृणालताई शेट्ये आदी ज्येष्ठ-श्रेष्ठ मान्यवर सहयोगींच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात महिला मोर्चाचे काम तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पार्टीने सोपवलेली जबाबदारी परिपूर्ण करण्यासाठी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन लक्ष्य निर्धारित करून संपूर्ण तालुक्यातील महिलांमध्ये भाजपाविषयी जिव्हाळा निर्माण करण्यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न रहातील. जो विश्वास नेत्यांनी दाखवला आहे तो नक्कीच सार्थ ठरवेन.”
संगमेश्वर (द.) तालुकाध्यक्ष श्री. रूपेश कदम, चिपळूण विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव, माजी उपनगराध्यक्ष व शहराध्यक्ष श्री. सुशांत मुळ्ये, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. अभिजीत शेट्ये, राजस्थान प्रकोष्ठ प्रदेश उपाध्यक्ष श्री. भगवतसिंह चुंडावत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. सुधीर यशवंतराव, सरचिटणीस श्री. यशवंत गोपाळ, श्री. रूपेश भागवत, बुद्धिवंत सेलचे जिल्हा संयोजक श्री. सदानंद भागवत, पदवीधर प्रकोष्ठचे जिल्हा संयोजक तथा माजी नगराध्यक्ष श्री. निलेश भुरवणे, माजी तालुका सरचिटणीस सौ. नुपूरा मुळ्ये आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्ते व हितचिंतकांनी सौ. स्नेहा फाटक यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन करण्याचे अभिवचन दिले.