रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना बुधवारीही सुट्टी

- मुसळधार पावसाचा इशारा; जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांचा आदेश
रत्नागिरी, दि. १९ : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि हवामान विभागाने दिलेल्या ऑरेंज अलर्टनुसार बुधवारी (दि. २० ऑगस्ट) जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. तसेच चिपळूणमधील वाशिष्ठी, संगमेश्वरमधील शास्त्री, लांजामधील काजळी आणि राजापूरमधील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्यतेने जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खासगी प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये तसेच आयटीआय संस्था यांना बुधवारी (दि. २० ऑगस्ट) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.