शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे : पोलीस अधीक्षक नितीन बगाटे

रत्नागिरी, दि. 2 : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापनाने आवश्यक त्या सर्व बाबींची आणि वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिल्या.
जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीस अपर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, वाहतूक शाखा पोलीस उपनिरीक्षक शरद घाग, शिक्षण विभागाचे रुखसाना भाटकर, म.रा.मा.प. महामंडळाचे रामेश्वर जायभाये, वाहतूकदार प्रतिनिधी प्रमोद यादव, आणि जिल्ह्यातील विविध शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीमध्ये श्री. बगाटे यांनी शालेय परिवहन समितीच्या माध्यमांतून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत आढावा घ्यावा. स्कूल वाहनांची सर्व कागदपत्रे (जसे नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, चालकाची अनुज्ञप्ती व बॅच) यांच्या वैधतेची तपासणी करावी. तसेच थांबे निश्चित करावेत इत्यादी सूचना दिल्या. पालकांनीही आपल्या मुलांची शाळेत ने-आण करताना सुरक्षित पर्यायाचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सर्व शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून शिक्षणाधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात
आलेली आहे. शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावली आणि मा. न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर तसेच अनधिकृत, अवैध व धोकादायक पध्दतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या दोषी वाहनांवर देखील कारवाई करण्याचे संकेत दिले. शाळांसमोरील रस्त्यावर कोणतीही दुर्घटना घडू नये आणि विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व शाळांसमोरील रस्त्यांवर गतिरोधक, इशारा फलक, रंबलर स्ट्रिप इत्यादी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याबाबत संबंधित सर्व रस्ते यंत्रणाना आदेशित करण्यात आले.
पोलीस व परिवहन विभागाने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे तपासणी करून दोषी
वाहनांवर व वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.