सिंधुदुर्गच्या शौर्याला मानाचा मुजरा : ‘भोसले सैनिक स्कूल’ अभिमानाचा नवा अध्याय!

- सैनिक स्कूल’च्या शानदार उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे मनोगत
सिंधुदुर्ग : आजचा हा क्षण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णक्षरांनी नोंद करण्यासारखा आहे. आपल्या जिल्ह्याच्या मातीचा आणि शौर्याचा महिमा सर्वश्रुत आहे, आणि याच मातीत आता एक ऐतिहासिक अध्याय जोडला गेला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा सैनिकांचे माहेरघर आहे, अनेक गावे सैनिकांची आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात एक दर्जेदार सैनिक स्कूल असावे ही भोसले कुटुंबीयांची इच्छा होती. या शाळेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातून देशाचे संरक्षण करण्यासाठी भविष्यात अधिकारी तयार होतील, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सैनिक आणि सैनिक स्कूल हा राणे कुटुंबियांसाठी नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे.

अभिमानास्पद वाटचाल
कोकणातील पहिले सैनिक स्कूल: श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित या ‘भोसले सैनिक स्कूल’ला केंद्रीय संरक्षण मंत्रालय आणि सैनिक स्कूल सोसायटीची मान्यता मिळणे, ही आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
कर्तृत्ववान नेतृत्व: या स्कूलची जबाबदारी अच्युत सावंत भोंसले यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या हाती दिली गेली आहे, हे देखील अत्यंत गौरवास्पद आहे. अच्युत सावंत यांचा प्रवास योग्य दिशेने होत आहे.
शौर्य आणि संघर्ष: आपल्या जिल्ह्याला शौर्याचा आणि संघर्षाचा मोठा इतिहास आहे. मालवण किनारपट्टीवर नुकताच साजरा झालेला नेव्ही डे आपल्या जिल्ह्याचे सैनिकांप्रती असलेले योगदान अधोरेखित करतो. या योगदानाला साजेसे असे हे स्कूल जिल्ह्याचे भूषण ठरेल.
सुवर्णसंधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित असताना, अशा राष्ट्रीय दर्जाच्या सैनिक स्कूलची निर्मिती ही येथील मुलांसाठी सुवर्णसंधी आहे.
पालकमंत्री म्हणून माझा शब्द:
या जिल्ह्यात जर कोणीही अशी अभिमानास्पद गोष्ट करीत असेल, तर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे.
तुम्ही निश्चिंत राहा! या पूर्ण प्रवासामध्ये आपण सर्वजण करीत असलेल्या वाटचालीत आम्ही पूर्णपणे आपल्या पाठीशी आहोत.
अडचण तुमची नाही, नितेश राणेंची असेल! जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल, कोणी वाट रोखत असेल, काही अडचण येत असेल, तर केवळ एक फोन करा. तुम्हाला येणारी अडचण ही तुमची नसून नितेश राणेंची असेल, यावर विश्वास ठेवा. लागेल ती संपूर्ण ताकद तुमच्या मागे उभी करू.
उच्च दर्जाचे शिक्षण: राणे साहेबांनी इंजिनिअरिंग आणि मेडीकल कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत.
केसरकर यांचे योगदान: माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांनीही शिक्षण विभागात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
भविष्यात या सैनिक स्कूलमधून जेव्हा अधिकारी घडतील आणि सांगतील की ‘आम्ही भोंसले सैनिक स्कूलमधून शिकलो’ तेव्हा त्याचा जिल्ह्याचा नागरिक म्हणून आम्हा सर्वांना अभिमान वाटेल. जिल्ह्यातील शहीद सैनिकांसाठी ही खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.
उपस्थित मान्यवर: राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे, माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भोंसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोंसले, अध्यक्षा ॲड. अस्मिता भोंसले, सचिव संजीव देसाई, भोंसले सैनिक स्कूलचे चिफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर रत्नेश सिन्हा, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद उपाध्यक्ष ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर, अभाविपचे कोकण प्रांत संघटन मंत्री निरज चौधरकर, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद अध्यक्ष मेजर विनय देगांवकर आदी उपस्थित होते.





