अवकाळी पावसामुळे परशुराम घाटातील वाहतूक विस्कळीत
सोमवारी रात्री पडलेल्या पावसामुळे माती रस्त्यावर; अनेक वाहने घाटातच अडकली
रत्नागिरी : सोमवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण नजीकच्या परशुराम घाटात माती रस्त्यावर येऊन वाहतुकीस विस्कळीत जाली आहे. आधीच हा घाट दिवसातील बहुतांश तास चौपदरीकरणाच्या कामासाठी बंदच ठेवण्यात येत आहे. त्यातच सोमवारच्या अवकाळी पावसाने दणका दिल्याने ठराविक वेळेत सुरू असणारी वाहतूक ठप्प पडली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्या नुसार जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोमवारी ते आज मंगळवारच्या सकाळपर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. चिपळूण परिसरात सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे परशुराम घाटात काम सुरू असलेल्या ठिकाणी घाटातील माती रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीत बाधा आली आहे. परशुराम घाटातून होणारी वाहतूक सध्या चिरणी, लोटे मार्गे वळवण्यात आली आहे.
परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पूर्वनिर्धारित ब्लॉक घेतला आहे. यानुसार दिनांक 25 एप्रिल ते १० मे या कालावधीत दुपारी 12 ते सायंकाळी पाच या वेळेत परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत आहे. यावेळी व्यतिरिक्त घाटातून महामार्गावरची वाहतूक सुरू असताना सोमवारी रात्री अवकाळी पाऊस झाल्यामुळे चौपदरीकरणणाच्या कामातील माती रस्त्यावर आली. यामुळे अनेक वाहने घाटातच अडकून पडली आहे.
मार्गिकेवर आलेली माती हटवून वाहतूक रोहित करण्यासाठी संबंधित ठेकेदार कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत.