उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार
अलिबाग : मागील वर्षभरात राज्यामध्ये मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत निवड केलेल्या उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पनवेल उपविभागीय अधिकारी श्री.राहुल मुंडके यांचा समावेश आहे.
श्री.मुंडके यांची 188-पनवेल या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयासाठी उत्कृष्ट कामगिरी करणारे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
राज्यस्तरावर सन्मानासाठी/ पुरस्कारासाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते दि. 25 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता पाटकर सभागृह, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्त तथा रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे आणि इतर सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच ही निवड झाली असल्याचे सांगून पनवेल उपविभागीय अधिकारी श्री.राहुल मुंडके यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.