कलावंतांची कार जाळल्याच्या घटनेला महिना उलटूनही तपास नाही
उरण तालुक्यात जसखार येथे ५ जानेवारीला घडली होती घटना
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील जसखार गावातील प्रख्यात कलावंत, महाराष्ट्रभूषण सचिन ठाकूर ह्यांची कार ५ जानेवारीला रात्री राजकीय सूडबुद्धीने जाळण्यात आली. सदर घृणास्पद प्रकार ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभवाचा राग मनात धरून घडला होता. घटनेची तक्रार न्हावा शेवा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती.
मात्र, या घटनेला घटनेला एक महिना होऊनदेखील
आजपर्यंत गुन्हेगारांचा तपास लागलेला नाही.
गावातील काहीना राजकीय वरदहस्त लाभल्यामुळे पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये मूळ धरत आहे. आगरी कोळी समाजातील एक प्रथितयश कलाकार राजकीय सूडचक्रामध्ये विनाकारण भरडला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढे गावात गाड्या जाळण्याचे, घरे फोडण्याचे प्रकार घडतील अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती आहे. एवढा मोठा गुन्हा घडून देखील काहीच कारवाई होत नसल्याने गावातील राजकीय पुढारी आणि त्यांचे चेले सोकावले आहेत.आरोपिंना पकडून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र भूषण, प्रसिद्ध कलावंत सचिन ठाकूर यांनी केली आहे.