Adsense
महाराष्ट्र

कोकणला ‘पर्यटन नियामक प्राधिकरण’ची आवश्यकता : धीरज वाटेकर

बोरज (खेड) : जागतिकीकरणानंतरच्या कालखंडात भौतिक प्रगतीच्या आधारे पर्यटनाकडे वळलेला माणूस एकविसाव्या शतकात कोकणात स्थिरावल्याचे चित्र आहे. कोकणात पर्यटन व्यवसाय जसजसा वाढेल तसतसे इथल्या प्रकृतीचे शोषणही वाढत जाईल, अशी भिती आहे. दुसरीकडे पर्यटन व्यवसायाच्या मुळाशी कोकणाचे प्राकृतिक सौंदर्य आहे. त्यामुळे ‘पर्यटन’ माध्यमातून स्वयंपूर्ण होऊ पाहणाऱ्या कोकणभूमीला स्वयंसिद्धतेकडे नेताना कोकणच्या प्राकृतिक सौंदर्याची कठोर काळजी घेणाऱ्या ‘पर्यटन नियामक प्राधिकरण’ची नितांत आवश्यकता असणार असल्याचे प्रतिपादन लेखक आणि पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी केले.

मोरवंडे-बोरज (खेड) येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानदीप विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने आयोजित केलेल्या (शनिवार, दि. २१) ‘कोकण स्वयंपूर्णतेकडून स्वयंसिद्धतेकडे’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ‘अपरिचित कोकणची सफर’ या विषयावरील दृकश्राव्य सादरीकरणादरम्यान वाटेकर बोलत होते. 

‘कोकण स्वयंपूर्णतेकडून स्वयंसिद्धतेकडे’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेला निमंत्रित केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य आणि परिषदेचे निमंत्रक डॉ. विजय कुलकर्णी आणि डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय मार्गताम्हानेचे प्रा. विकास मेहंदळे यांना वाटेकर यांनी धन्यवाद दिले.

स्वतंत्र ‘कोकण विकास प्राधिकरण’ स्थापन करण्याचा विचार होत असताना पर्यावरणासारख्या नाजूक विषयाकडे काळजीपूर्वक पाहिले जायला हवे आहे. पर्यटन राज्य असलेल्या केरळनेही ‘जबाबदार पर्यटन’ (रिस्पॉन्सिबल टुरिझम) संकल्पनेसह ‘पर्यटन नियामक प्राधिकरण’ स्थापन केले आहे. ‘पर्यटन नियामक प्राधिकरण’ म्हणून कार्यरत होताना आपल्याला संपूर्ण कोकण भूमीतील शाश्वत पर्यटनासाठी पर्यटन सेवांचे नियमन आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी लागतील. कोकण पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी आचारसंहिता विकसित करून त्याची अंमलबजावणी करावी लागेल. उपलब्ध नैसर्गिक संपन्नता सांभाळून कोकण पर्यटन क्षेत्रात शाश्वत पर्यटनासाठी अनुकूल वातावरण विकसित करावे लागेल त्याचा प्रचार करावा लागेल असे वाटेकर म्हणाले.

कोकणातील अप्रतिम शिल्पकला, गडकोट, मंदिरे हा ठेवा गतकाळातील पूर्वजांच्या कर्तृत्वाने मन मोहरून यावे असा आहे. आपण कोकणच्या गतवैभवाचा, इतिहासाचा अभिमान बाळगायला हवा असे वाटेकर म्हणाले. ८२ पॉवरपॉईंट स्लाईड्सद्वारे वाटेकर यांनी श्रावण कृष्ण त्रयोदशी या कोकण क्षेत्र निर्मिती दिनापासून कोकणातील निसर्गस्थाने’, ‘वशिष्ठी उगम ते संगम’ उपक्रम, तिलारी-दोडामार्ग-खडपडे-कुंभवडे-चौकुळ-आंबोलीचे जैवविविधतेने परिपूर्ण निसर्ग वैभव, ३६५ दिवस आंबोली संकल्पना, रौद्रभीषण निसर्गनवल ८०० फुट उंचीचा भीमाची काठी सुळका, तिवरे ते मालदेव व्हाया बैलमारव घाट, कुंभे निजामपूर बोगदा परिसर निसर्ग, महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्यात हेवाळे आणि बांबर्डे गावांच्या हद्दीवर असलेली दुर्मीळ मायरिस्टिका स्वॅम्पची (जंगली जायफळ) देवराई, कोकणातील ठाणे-पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील सागरकिनारे, हेदवीची समुद्रघळ, मालवण आणि रत्नागिरी येथील स्कुबा डायव्हिंग, त्सुनामी आयलंड (मालवण), कोकणातील खाडी किनाऱ्यावर असलेले वैशिष्ट्यपूर्ण किनारी आणि सागरी दुर्ग, १६६१ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी घनदाट अरण्यात गनिमी कावा तंत्राचा अवलंब करून कारतलबखानाच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्याचा पराभव केलेली या उंबरखिंड, कोकणातील कोकणात ६४ नद्यांच्या खोऱ्यात असलेल्या ४२ रमणीय खाड्या, कोकण आणि देश याना जोडणारे घाट रस्ते, धबधबे, पाऊस, सडा : कोकणातील एक वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था, कमळतळी, तळ कोकणातील धरणे, कोकणातील संग्रहालये, प्राचीन विहिरी, मानवी संस्कृतीचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करणारी कातळशिल्पे, कोकणातील जलमंदिरे, गुहा मंदिरे, देवराया, दगडी पार, पोर्तुगीज घंटा, वारूळ देवता, किमान हजार वर्षेपूर्व मूर्तीकला, लाकडावरील कोरीव काम, जल संचयन पद्धती, कोकणी श्रद्धा, कोकणातील अष्टविनायक, बारव, दर्गे-मशीद, पारंपरिक मासेमारी, सागरी महामार्गाचे सौंदर्य, अश्मयुगकालीन गुहा, जंगलातील दुभंगलेल्या मूर्ती, मिठागरे, हेरीटेज होम, कोकणातील उत्सव, कोकणातील माणसे, इथली वाचनालये आणि माध्यमांची परंपरा आदी कोकणातील अपरिचित मुद्यांचा उहापोह वाटेकर यांनी आपल्या सादरीकरणात केला.

In article

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button