कोकणातील मत्स्य व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यास कटीबद्ध : ना. सुधीर मुनगंटीवार
महिला उद्योग आघाडीच्या नेत्या उल्का विश्वासराव यांनी घेतली मत्स्य व्यवसाय मंत्र्यांची भेट
देवरूख (सुरेश सप्रे : “अमृत काळातील बजेट सादर करताना कोकणातील कष्टकरी लाभ घेऊ शकतील अशा अनेक योजना मांडल्या. त्याचा लाभ कोकणातील कष्टकर्यांना समृद्ध करणे ही जबाबदारी स्थानिक पातळीवर काम करणार्या कार्यकर्त्यांची आहे, या जाणीवेतून वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची उद्योग महिला आघाडीच्या नेत्या सौ. उल्का विश्वासराव यांनी मंत्रालयात भेट घेऊन कोकणातील मत्स्यव्यवसाय वाढीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली.” त्यावर मंत्री महोदयांनी मत्स्य व्यावसायिकांच्या समस्या सोडवून त्यांना सक्षम करण्यासस मी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
कोकणातील रत्नागिरीचा किनारपट्टी भाग मत्स्य व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. मच्छिमार बांधव आजही हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीने करताना दिसून येत आहेत. अशातच केंद्र सरकारची प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आमच्या या बांधवांसाठी वरदान ठरेल. आपण याकामी स्वतः लक्ष घालावे अशी विनंती सौ. विश्वासराव यांनी मंत्री मुनगंटीवार यांना केली.
खात्यामार्फत मत्स्य व्यवसाय सक्षम करण्यासाठी योजनेचा लाभ कसा घेता येईल, याबाबत केलेले प्रेझेंटेशन उपस्थित मंडळींना दाखवले.
सुधीरभाऊंनी माझ्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील माझ्या मत्स्यव्यवसायिक बांधवांनी आधुनिकतेची कास धरण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा यासाठी योजना प्रत्यक्षात येईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करत राहीन असे मत सौ. उल्का विश्वासराव यांनी व्यक्त केले.