ग्राहक जागृती होणे अत्यावश्यक : नीलेश गोयथळे
गुहागरमध्ये जागतिक ग्राहक दिन साजरा
गुहागर : ग्राहकांचे होणारे शोषण थांबवून त्याच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने ‘ग्राहक संरक्षण कायदा’ अंमलात आणला, पण केवळ कायदा करून त्यामागील उद्दिष्ट साध्य होत नाही. भारतासारख्या विकसनशील देशात खर्या अर्थाने ग्राहक संरक्षण व्हायचे असेल तर ग्राहक प्रशिक्षण, ग्राहक प्रबोधन व ग्राहक जागृती होणे अत्यावश्यक आहे. असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा सह सचिव श्री. निलेश गोयथळे यांनी केले.
येथील भंडारी भवन येथे स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. १५ मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन निमित्त गुहागर तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यावतीने अनेक ठिकाणी ग्राहक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष गणेश धनावडे, निलेश मोरे, अमरदीप परचुरे, अद्वैत जोशी, हेमंत बारटक्के, अनिल किर आदी उपस्थित होते.
श्री. गोयथळे पुढे म्हणाले की, ग्राहकाला अर्थव्यवस्थेचा राजा असे संबोधले जात असले तरी त्याला बाजारपेठेत सतत अडवले जाते, नाडले जाते अन् फसवले तर जातेच जाते. आपण खरेदी करत असलेली वस्तू योग्य दर्जाची, योग्य गुणवत्तेची व वाजवी किमतीची असावी एवढीच त्याची किमान अपेक्षा असते. पण त्याच्या नशिबी मात्र सतत अपेक्षाभंग अन् मनस्तापच! अनेकविध समस्यांच्या चक्रव्युहात सापडलेल्या ग्राहकांचे प्रश्न अनंत आहेत. ठेकेदाराला सुपूर्द करून प्रश्न सुटत नसतात. बंद, मोर्चे, निदर्शने, रास्ता रोको यासारख्या आंदोलनानेही प्रश्नांची स्थायी स्वरूपाची उत्तरे मिळत नाहीत. ग्राहक संरक्षण कायद्याच्या आधारे काही प्रश्न सोडविता येतीलही, पण त्यालाही मर्यादा आहेच. म्हणून आपले प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:च पुढाकार घ्यावा व आपल्याला ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी मार्गदर्शन करतील, असे त्यांनी सांगितले.
तालुकाध्यक्ष गणेश धनावडे यांनी तालुक्यातील ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत गुहागर सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले.