महाराष्ट्र

घटनाबाह्य पद्धतीने पद पटकावून उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राची फसवणूक : केशव उपाध्ये

मुंबई : शिंदे फडणवीस सरकारच्या नावाने बोटे मोडत सरकारला घटनाबाह्य ठरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपदच घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे बाळासाहेबांवर निष्ठा असलेल्या तमाम शिवसैनिकांची आणि घटनाबाह्य पदाचा फायदा घेत मुख्यमंत्रीपद पटकावून महाराष्ट्राची फसवणूक केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी व पक्षप्रमुख पदावरून पायउतार व्हावे असे आव्हान प्रदेश भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी दिले आहे.

अगोदर ठाकरे यांनी घटनाबाह्य रीतीने पक्षप्रमुखपद पटकावले, आणि नंतर त्याचा फायदा घेऊन संघटनेस काखोटीला मारून मुख्यमंत्रीपदही पटकावले. सामान्य शिवसैनिकास मुख्यमंत्रीपदी बसविण्याच्या बाळासाहेबांच्या इच्छेची उद्धव ठाकरे यांनी आपल्या दुटप्पी वागणुकीतून खिल्ली उडविली आहे, असा आरोप त्यांनी केला. ‘बाळासाहेब भोळे होते, मी धूर्त आहे’, असे उद्धव ठाकरे यांनी एकदा अभिमानाने सांगितले होते. पदे पटकावण्याचा कट करून त्यांनी आपला धूर्तपणा सिद्ध केला, पण सामान्य शिवसैनिकासोबत बाळासाहेबांचीही फसवणूक केली, असा आरोपही त्यांनी केला.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १९९९ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेली शिवसेनेची घटना बाळासाहेबांवर केंद्रित होती. बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना कार्याध्यक्ष हे पद उद्धव ठाकरे यांना देण्यात आले होते, मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर घटनेत बदल न करता शिवसेना पक्षप्रमुख हे पद तयार करण्यात आले. घटनाबाह्य पद्धतीने २०१८ मध्ये कुणालाही कल्पना न देता हे बदल करण्यात आले आणि या पदावर उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली. त्यामुळे ठाकरे यांचे पदच बेकायदेशीर आहे. शिवसेना पक्षप्रमुख या पदाला आमचा विरोध नाही, मात्र पदावर बसल्यावर ठाकरेंनी जे बदल केले त्यावर आमचा आक्षेप आहे, असा दावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या सत्तालोभाचे पितळ उघडे पडत असून आता ठाकरे पितापुत्रांनी यावर पाळलेले मौन बरेच बोलके आहे, असा टोलाही उपाध्ये यांनी मारला.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button