चिपळूण परिसरातील १२ शाळांसाठी अग्रणी उपक्रमांतर्गत कार्यशाळा
चिपळूण : ज्ञान प्रबोधिनीच्या चिपळूण संपर्क केंद्राच्या माध्यमातून चिपळूण परिसरातील निवडक १२ शाळांसाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या आग्रणी योजना या उपक्रमासंबंधात एक दिवसाची कार्यशाळा संपन्न झाली.
शैक्षणिक वर्ष २०१७ मध्ये पहिल्यांदा परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित न्यू इंग्लिश स्कूल पोफळी आणि आलोरे या शाळांमध्ये सुरू झालेला अग्रणी हा उपक्रम नंतरच्या एक दोन वर्षात संस्थेच्या युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण येथेही सुरू झाला या शाळांमध्ये हा उपक्रम अत्यंत उत्तम प्रकारे नियमितपणे चालू आहे.परिसरातील अन्य शाळांमध्येही हा उपक्रम सुरू व्हावा आणि त्या त्या शालेय उपक्रम रचनेचा भाग व्हावा या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणचे मुख्याध्यापक श्री. शिंदे सर, उपमुख्याध्यापिका सौ.पाटील मॅडम आणि पर्यवेक्षक श्री.बनसोडे सर यांच्या हस्ते मातृभूमीच्या प्रतिमेच्या पूजनानंतर सौ.मानसी ताई पेढांबकर यांनी प्रास्ताविकातून अग्रणी उपक्रमाच्या कार्यशाळेचा हेतू आणि उद्देश स्पष्ट करून सांगितला.युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण आणि न्यू इंग्लिश स्कूल पोफळी या शाळेतील १४ विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून अग्रणी उपक्रमाची उपयुक्तता महत्त्व उपस्थित अध्यापकांसमोर प्रभावीपणे आणि मुद्देसूद मांडले.उपक्रमातून होणारे कौशल्य प्रशिक्षण, अनुभव शिक्षण, सभाधारिष्ट, नेतृत्व करायची संधी, जबाबदारीची होणारी जाणीव आणि सगळ्यात महत्त्वाचे स्वतःला आजमावून पहायची संधी यामुळे हा उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये व्हायला हवा असे सर्वच विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आग्रहपूर्वक आवाहन केले.
यानंतर न्यू इंग्लिश स्कूल पोफळी प्रशालेमध्ये सलग सहा वर्षे नियमितपणे अग्रणी उपक्रम प्रमुख म्हणून जबाबदारी पाहणाऱ्या श्री.परागदादा लघाटे यांनी अग्रणी उपक्रमाची एकूण रचना,अग्रणी उपक्रम म्हणजे काय, अग्रणी निवड प्रक्रिया,अग्रणी उपक्रमातून कोणती उद्दिष्टे साध्य होतात असे पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून सांगत शाळांनी मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या उपक्रमाकडे आग्रहपूर्वक पाहिले पाहिजे असे सुचवले.
निगडी पुणे येथील गुरुकुल विभागात अध्यापन करणाऱ्या श्रीरामदादा इनामदार याने राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व सिद्ध केलेल्या काही मोठ्या व्यक्तींची उदाहरणे देऊन अग्रणी उपक्रम म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व निर्माण करण्याची किंवा त्याची पायाभरणी करण्याची शाळा स्तरावरील उत्तम संधी असल्याचे सांगितले.
यानंतरच्या सत्रामध्ये अग्रणी उपक्रमा संबंधी शाळा स्तरावरती आयोजनाच्या दरम्यान येणाऱ्या अडचणी समस्या आणि त्यावरील उपाय याविषयीचे अनुभव कथन परागदादा लघाटे यांनी केले तसेच उपस्थित अध्यापक यांच्या सोबत या विषयी सामूहिक चर्चा करण्यात आली आणि पूर्व तयारी म्हणून अग्रणी उपक्रमाच्या एक महत्त्वाचा भाग असलेले नेतृत्व प्रशिक्षण शिबिर एप्रिलच्या पंधरा तारखेच्या दरम्यान आयोजित करण्याविषयी एकत्र चर्चा करण्यात आली.
यानंतर उपस्थित संस्था संचालक प्रतिनिधींपैकी श्री. निर्मळ सर सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे यांनी आजच्या कार्यशाळेच्या माध्यमातून अग्रणी उपक्रमा संबंधी समजलेल्या माहितीबद्दल समाधान व्यक्त करून हा उपक्रम अनेक शाळांच्या उपक्रम रचनेचा भाग व्हायलाच हवा असे मत व्यक्त केले.तसेच इंग्रजी माध्यमाच्या एसपीएम परशुराम शाळेच्या प्रतिनिधी असलेल्या श्रीमती जोशी मॅडम यांनी शाळेत चालू असलेल्या पथक रचनेत अग्रणी उपक्रमाच्या आधारे आणखीन नाविन्य आणता येईल अशा काही गोष्टी आजच्या कार्यशाळेमधून लक्षात आल्याचे सांगितले.
चिपळूण संपर्क केंद्राच्या केंद्रप्रमुख असलेल्या स्वातीताई मुसळे यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झालेल्या या कार्यशाळेत श्री.माधव मुसळे, श्रीमती स्मिताताई जागुष्टे यांनी तसेच युनायटेड इंग्लिश स्कूलच्या सौ.मानसी ताई पेढांबकर आणि सौ.दीपाताई गद्रे यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी पूर्वतयारी आणि कार्यशाळा संपन्न होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.