महाराष्ट्र

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे सामाजिक व धर्मरक्षणाचे काम श्रेष्ठ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

श्रीराम नवमी उत्साहात

नाणीज, दि. ३० : जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांनी धर्माचे रक्षण करण्याचे काम केले. त्याचबरोबर त्यांचे सामाजिक कार्यही तेवढेच श्रेष्ठ आहे, असा गौरव केंद्रीय रस्ते, वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केला. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आज नाणीजक्षेत्री प्रचंड उत्साहात श्रीराम नवंमी उत्सव साजरा करण्यात आला. त्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक आले होते.

कॉलेज इमारतीचे भूमीपूजन-
पाहुण्यांचे बरोबर १.२० वाजता सुंदर गडावर आगमन झाले. लगेच मंत्री गडकरी व सामंत यांच्या हस्ते जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या कॉलेज इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाला. यावेळी कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी जगद्गुरूश्री, प.पू. कानिफनाथ महाराज उपस्थित होते. त्यानंतर सर्वांनी संतशिरोमणी गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आरती केली. त्यानंतरच्या समारंभ सोहळ्यात मंत्री गडकरी बोलत होते.
नैसर्गिक जागेचा सुंदर वापर-
ते पुढे म्हणाले,” माझी येथे येण्याची बरेच दिवसांची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली आहे. जगद्गुरूश्री यांनी येथील नैसर्गिक भूमीचा, जागेचा अतिशय सुंदर उपयोग करून घेतलेला आहे. येथील, भव्य संतपीठ, समोरचे स्टेडियमसारखी म्हणजेच ओपन इअर थिएटर सारखी रचना. झाडांच्या सावलीत बसण्याची व्यवस्था केली. याबाबत महाराजांचे अभिनंदन. ”
ते म्हणाले, “हिंदू धर्म पवित्र, सहनशील आहे. येथील जीवनपद्धती आदर्श आहे. शिकागो येथील भाषणात स्वामी विवेकानंद म्हणाले होते की ‘येथें मी माझा धर्म सांगायला आलो नाही. तुमचा विश्वास आहे तो धर्म व तो परमेश्वर श्रेष्ठ आहे.’ सर्व देवो नमस्कार: केशवं प्रतिगछती असे हे आहे. येथे महाराजांचे केवळ धार्मिक कार्य नाही. त्यांचे दुष्काळ, भूकंप, अतिवृष्टी, कोरोना काळातील काम मोठे आहे.”
ते पुढे म्हणाले, “महाराजांचे सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी धर्माचे रक्षण केले. अनेक लोकांना वाचवले. अनेक लोक गैरसमजुतीतून गेले, त्यांना त्यांनी परत आणले. आपण कोणाच्या विरोधात नाही. आपण विश्वाचे कल्याण चिंतणारे आहोत. पण धर्माचा संबंध कर्तव्याशी असतो. कर्तव्याचा अधिकाराशी व अधिकाराचा तत्व, विचार, मूल्यांशी असतो. मी सर्व तीर्थक्षेत्रांना जोडणारे रस्ते केले. व्यसनमुक्ती, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिवर्तनातून सुखी, समाधानी राष्ट्र निर्माण होते.”
गडकरी, सामंतांचा गौरव- सुरुवातीस जगद्गुरू श्री यांनी श्री गडकरी, श्री सामंत यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले,” श्री गडकरी हे दूरदर्शी, यशस्वी नेते आहेत. ते कार्याच्या मुळाशी जातात, त्याचा पूर्ण अभ्यास करतात व ते काम पूर्णत्वाला नेतात. आम्ही या डोंगराचा केलेला कल्पक वापर त्यांच्या बारीक नजरेतून सुटला नाही. त्यांची इलेक्ट्रिक वाहने, इथेनॉलचा वापर, ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट ला चालना ही कामे दुरदृष्टीची आहेत. शिवाय काश्मीर ते कन्याकुमारी, सोरटी सोमनाथ ते जगन्नाथपुरी, तसेच सर्व तिर्थक्षेत्रांना जोडणारे रस्ते केले. त्यातून भक्तांच्या आस्थेची पुंजी वाढवण्याचे काम केले आहे. खऱ्या अर्थाने ते हायवे मॅन आहेत. ”
” श्री गडकरी यांनी नाणीज नवा मठ ते जून मठ हा पालखी मार्गाचा रस्ता सहा पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ते दूरदर्शी, प्रश्नावर पकड, नवीन करण्याचे धाडस असलेले, खुल्या मनाचे, अजातशत्रू नेते आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी मंत्री सामंत यांच्या कार्याचा गौरव केला.
संतपीठावर स्वागत-
संतपीठावर सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत प.पु. कानिफनाथ महाराज यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. उभय मंत्र्यांचा नागरी सत्कार जगद्गुरू श्रींनी केला. या सोहळ्यावेळी मंत्री उदय सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, रत्नागिरी टाइम्सचे संपादक सुरेश घोसाळकर, विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रद्धा बोडेकर यांनी केले.
श्रीराम जन्मोत्सव उत्साहात-
मुख्य सोहळ्यापूर्वी श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात झाला. त्यामित्त मंदिर अकर्षकरित्या सजवण्यात आले होते. पाळनाही फुलांनी आकर्षक सजवला होता. ‘राम जन्मला ग सखे, राम जन्मला यासह अनेक गाणी वाजत होती. त्यावेळी महिलांनी पाळणा म्हटला. यावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज, सौ सुप्रियाताई, प.पू. कानिफनाथ महाराज. सौ ओमणीताई, त्यांची मुले सोहळ्यात सहभागी झाली होती. त्यांनी पाळण्याची पूजा केली.
भाविकांची प्रचंड गर्दी-
दोन दिवस चाललेल्या या सोहळ्याला भाविकांची प्रचंड गर्दी होती. आज सप्त चिरंजीव महामृत्यूनंजय यागाची सांगता झाली. दोन दिवस सूर असलेल्या मोफत आरोग्य शिबिराची सांगता झाली. दोन्ही दिवस २४तास महाप्रसाद सुरू होता.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button